नग्न करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलाला दारु पाजली
सिगारेट-मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 मार्च 2025
मुंबई, – नग्न करण्याची धमकी देऊन एका सतरा वर्षांच्या कॉलेज मुलाला जबदस्तीने सिगारेट आणि मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार रंगपंचमीच्या दिवशी लालबाग परिसरात घडली. याप्रकरणी एकाच इमारतीमध्ये राहणार्या अरविंद सावंत नावाच्या रहिवाशाविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
53 वर्षांचे तक्रारदार त्यांच्या कुटुंबियांसोबत लालबाग परिसरात राहतात. ते ऑटोमोबाईल इंजिनिअर असून सध्या शेअरमार्केटमध्ये ट्रेडिंग करतात तर त्यांची पत्नी नवी मुंबईतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांना सतरा वर्षांचा एक मुलगा असून तो परळ येथील कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिकतो. तो सध्या इंजिनिअरींग प्रवेशासाठी एमएचसीईटीची तयारी करत आहे. शुक्रवारी रंगपंचमी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत इमारतीमध्ये रंगपंचमी खेळत होता. दुपारी अडीच वाजता तो त्याच्या मित्रांसोबत रंगपंचमी खेळण्यासाठी बाहेर गेला होता. लाडू सम्राट दुकानाच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये म्युझिक सुरु होते.
तिथे ते सर्वजण एकमेकांना रंग लावून धमाल मस्ती करत होते. यावेळी अरविंद सावंत हा तिथे आला. त्याने त्यांच्या अल्पवयीन मुलाला जबदस्तीने सिगारेट पिण्यास लावले. त्यानंतर त्याला दारु पिण्यास प्रवृत्त केले होते. त्याने तसे केले नाहीतर घरी नग्न करुन पाठवू अशी धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी त्याने सिगारेट आणि मद्यप्राशन केले होते. सायंकाळी साडेचार वाजता तो त्याच्या घरी गेला होता. यावेळी त्याच्या तक्रारदार पित्याला त्याने मद्यप्राशन केल्याचे दिसून आले. पहिल्यांदाच मद्यप्राशन केल्याने त्याला चक्कर येत होती. त्यामुळे त्याला घेऊन ते केईएम हॉस्पिटलमध्ये आले होते. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले.
चौकशीनंतर अरविंद सावंत यानेच त्यांचा मुलगा अल्पवयीन आहे हे माहित असताना त्याला जबदस्तीने सिगारेट आणि मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केले होते. त्यानंतर त्यांनी काळाचौकी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अरविंद सावंत याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अरविंद सावंत याची पोलिसांकडून लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविली जाणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.