मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – वरळी सी लिंकवरुन कोस्टल रोडला जाणार्या समुद्रात उडी घेऊन एका 30 वर्षांच्या तरुणाने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. दर्शित राजभाई शेठ असे या व्यक्तीचे नाव असून त्याच्याकडे सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे अधिकृत कारण समजू शकले नाही. मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता दर्शितने समुद्रात उडी घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी पोलिसांना सापडला. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. दर्शितच्या आई, बहिणीसह पत्नीची पोलिसांकडून लवकरच जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीनंतर त्याच्या आत्महत्येबाबत खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मालाडचा रहिवाशी असलेला दर्शित हा बीकेसी येथील एका खाजगी कंपनीत कामाला होता. मंगळवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता. सायंकाळी तो कामानिमित्त वरळी सी लिंकवर त्याची हुंडाई कार 20 घेऊन गेला होता. सायंकाळी साडेसात वाजता तो वरळी सी लिंकवरुन कोस्टल रोडच्या दिशेने जाणार्या रोडवर आला होता. कार बाजूला पार्क केल्यानंतर त्याने अचानक समुद्रात उडी घेतली होती. ही माहिती काही वाहनचालकाकडून समजताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नौसेना, अग्निमशन दलासह सागरी पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नव्हता.
अंधारामुळे ही शोधमोहीम नंतर थांबविण्यात आली होती. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह वरळी पोलिसांना सापडला. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याच्या कारमध्ये पोलिसांना काही दस्तावेज आणि मोबाईल क्रमांक सापडला होता. या कागदपत्रांसह मोबाईलवरुन त्याची ओळख पटली होती. त्यानंतर ही माहिती त्याच्या आईसह बहिणीला देण्यात आली होती. दर्शितकडे पोलिसांना कुठलीही सुसायट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या का केली याचा उलघडा होऊ शकला नाही. मात्र दर्शित काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
प्राथमिक तपासात दर्शित सध्या त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. तसेच त्याची पत्नीचीही जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.