मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 मार्च 2025
मुंबई, – गांजाची विक्रीसाठी वांद्रे परिसरात आलेल्या एका 36 वर्षांच्या आरोपीस वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. इम्रान कमालुद्दीन अन्सारी असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी 71 लाख 76 हजार रुपयांचा 286 किलो 680 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वांद्रे येथे दया नायक व त्यांच्या पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
ताडदेव येथे राहणार्या इम्रान नावाच्या एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असून या गांजाची विक्रीसाठी तो वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर दया नायक व त्यांच्या पथकाने वांद्रे येथील रिक्लेमेशन, केसी रोड, ट्रॉन्झिंट कॅप, चाळ क्रमांक तीसच्या रुम सहामध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी इम्रान अन्सारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
तपासात इम्रान हा ताडदेव येथील पोस्ट कार्यालयाजवळील न्यू अफरोज रोड, नगीना मशिद, तुळशीवाडीत राहत असून चालक म्हणून कामाला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 286 किलो 680 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचा गांजाचा साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत 71 लाख 76 हजार रुपये इतकी आहे. हा साठा जप्त केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. याप्रकरणी सहाय्यक फौजदार सुभाष शिंदे यांच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी इम्रान अन्सारीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने हा कोणी दिला, वांद्रे येथे तो कोणाला गांजा विक्रीसाठी आला होता. त्याने यापूर्वीही गांजासह इतर ड्रग्जची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.