आढावा बैठकीत उपशाखाप्रमुख महिलेचा विनयभंग

माजी नगरसेविकेच्या समन्वयक पतीविरुद्घ गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मार्च २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत एका उपशाखाप्रमुख महिलेचा तिच्याच परिचित माजी नगरसेविकेचा पती आणि मागाठाणे विधानसभा समन्यवक संजय सिंघण याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन संजय सिंघन याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

५३ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत ही नवी मुंबईतील कळंबोली परिसरात राहते. तिचे पती इंजिनिअर असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. तिचा मुलगा आणि सून हे दोघेही नोकरी करतात. दोन वर्षांचा नातू असल्याने ती त्याचा सांभाळ करते. तक्रारदार महिला पूर्वी बोरिवलीतील कुलूपवाडी, रेहमान चाळीत राहत होती. ती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शाखा क्रमांक बाराची महिला उपशाखाप्रमुख म्हणून काम करते. मंगळवारी १२ मार्चला सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे गटाची बोरिवलीतील देवीपाडा, फुलपाखरु मैदानातील जीमवरील गार्डन हॉलमध्ये एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत तिच्यासह शंभरहून अधिक शिवसैनिक उपस्थित होते. रात्री साडेआठ वाजता बैठक संपल्यानंतर ती त्यांच्या शाखा समन्वयक माधुरी खानविलकर हिच्याशी एसआरए प्रोजेक्टसंदर्भात चर्चा करत होती. याच दरम्यान तिथे संजय सिंघन आला आणि त्याने तिला मी कोणाचेही पैसे खाल्ले नाही असे म्हणत तिच्या छातीला हात लावून तिला मागे ढकळले. त्यानंतर हातवारे करुन तिला आता चांगलीच चेपली पाहिजे असे बोलून तिच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यातील वाद वाढत असल्याचे लक्षात येताच उपस्थित शिवसैनिकांनी हा वाद शाखेत सोडवू असे सांगत त्यांना शाखेत बोलाविले होते.

अचानक घडलेल्या या महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने शाखेत न जाता कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संजय सिंघन याच्याविरुद्ध ३५४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page