मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2025
मुंबई, – गैरकायदेशीरपणे सोन्याची खरेदी-विक्री करत असल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल करुन कारवाईची धमकी देत चार तोतया आयबीचे अधिकार्यांनी एका ज्वेलर्स व्यापार्याकडे 25 लाखांची खंडणीची मागणी करुन साडेअकरा लाखांची खंडणी वसुली करुन पलायन केले. याप्रकरणी तोतयागिरी करुन खंडणीची मागणी करुन खंडणी वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही तोतया अधिकार्यांना व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली आहे. पवन सुधाकर चौधरी, श्रीजीत मदन गायकवाड, सूर्यकांत शिवाजी शिंदे आणि किसन धोंडीबा शेलार अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही गिरगाव येथील लोकल कोर्टाने पाोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
शंकरसिंह खानसिंह राठोड हे ज्वेलर्स व्यापारी असून ते भायखळा येथील घोडपदेव परिसरात राहतात. त्यांचा गिरगाव येथील भोईवाडा, बबुलावाला इमारतीच्या तिसर्या मजल्यावर बालाजी गोल्ड नावाचे एक कार्यालय आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता ते त्यांच्या कर्मचार्यासोबत कार्यालयात काम करत होते. याच दरम्यान त्यांच्या कार्यालयात चारजण आले होते. या चौघांनी ते दिल्लीतील आयबीचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांच्या कार्यालयाची तपासणी सुरु केली. ते सोन्याच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असून हा संपूर्ण व्यवहार कॅश स्वरुपात चालतो. अशा प्रकारे व्यवहार करणे गुन्हा आहेत. त्यांच्याविरुद्ध त्यांच्याकडे भक्कम पुरावे आहेत असून त्यांच्याविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल होणार आहे. या गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची धमकी दिली होती.
या प्रकारामुळे शंकरसिंग राठोड हे प्रचंड घाबरले होते. त्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना मिळालेली माहिती चुकीची आहे. आपण कुठलाही गैरव्यवहार करत नाही असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या चौघांनी त्यांच्यावर कारवाईची धमकी देत या गुन्ह्यांत सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर 25 लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. ही रक्कम जास्त असल्याने त्यांनी त्यांना साडेअकरा लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर ते चौघेही त्यांच्याकडून साडेअकरा लाख रुपये घेऊन निघून गेले होते.
घडलेला प्रकार त्यांनी त्यांच्या परिचित व्यापार्यांना सांगितला. यावेळी त्यांनी त्यांना गुप्तचर विभागाकडून अशी कोणतीही कारवाई होत नाही. त्यांची तोतया आयबीच्या अधिकार्यांनी फसवणुक केली असून त्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी व्ही पी रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित चारही तोतया आयबी अधिकार्याविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध तोतयागिरी करुन खंडणीची मागणी करुन खंडणी वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पळून गेलेल्या चारही आरोपींचा शोध सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी पवन चौधरी, श्रीजीत गायकवाड, सूर्यकांत शिंदे आणि किसन शेलार या चौघांनाही वेगवेगळ्या परिसातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील काही कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या चौघांनाही गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.