बुक केलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन ५० लाखांची फसवणुक
वयोवृद्ध हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ मार्च २०२४
मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) – कामानिमित्त विदेशात वास्तव्यास असलेल्या वयोवृद्ध हॉटेल व्यावसायिकाचा विश्वासघात करुन एका निर्माणधीन इमारतीमध्ये बुक केलेल्या त्याच्याच मालकीच्या फ्लॅटची दुसर्या व्यक्तीला परस्पर विक्री करुन सुमारे ५० लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार देवनार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यावसायिकाच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलिसांनी पारस सुंदरजी देढिया या आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. चार वर्षांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने तक्रारदार व्यावसायिकाला धक्काच बसला होता. फ्लॅटच्या संपूर्ण व्यवहाराची विश्वासाने जबाबदारी ज्या व्यक्तीकडे सोपविली, त्यानेच त्यांचा विश्वासघात केला.
६९ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार कोरच्चन कुझीईल मोहनदास के हे मूळचे केरळचे रहिवाशी असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील देवनार, आचार्यनगर परिसरात राहतात. त्यांचा हॉटेलचा व्यवसाय असून केरळ शहरात त्यांच्या मालकीचे एक हॉटेल आहे. १९९३ ते २०१९ या कालावधीत ते मस्कत आणि ओमान या देशात कामानिमित्त होते. यावेळी त्यांनी गुंतवणुक म्हणून एक फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा बालपणीचा मित्र सुरज पांडे याने त्यांची ओळख पारस देढियाशी करुन दिली होती. त्याने त्यांना यश बिल्डरची शीव-ट्रॉम्बे रोडवरील टेलिकॉम फॅक्टरीसमोरील यश सिग्नेचर नावाच्या एका इमारतीचे बांधकाम साईट सुरु असल्याचे सांगून तिथे फ्लॅट बुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते पारससोबत डिसेंबर २०१५ रोजी यश सिग्नेचर या बांधकाम साईटवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या प्रोजेक्टची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी तिथे एक फ्लॅट बुक केला होता. यावेळी त्यांनी पारसच्या मदतीने बिल्डरला ५० लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांना यश सिग्नेचर इमारतीमध्ये सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाच्या फ्लॅटचे ताबा पत्र देण्यात आले होते. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांना फ्लॅटचा ताबा मिळणार होता. त्यामुळे ते २०१५ ते २०१९ या कालावधीत पुन्हा विदेशात कामानिमित्त निघून गेले होते.
फेब्रुवारी २०२० रोजी ते भारतात परत आले होते. यावेळी त्यांना इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती समजली होती. त्यामुळे त्यांनी फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी पारस देढियाला संपर्क साधला होता. यावेळी त्याने त्यांना इमारतीला मनपाचे ओसी प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे ताबा मिळण्यास थोडा उशीर होईल असे सांगितले. त्यानंतर तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांना पारसने त्यांच्या मालकीचा फ्लॅट परस्पर अमुल्य पांडा या व्यक्तीला विक्री केल्याचे समजले होते. त्याचे कायदेशीर रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. या प्रकारानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी पारसकडे फ्लॅटसाठी दिलेल्या ५० लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने पैसे परत न करतात्यांची फसवणुक केली. त्यामुळे त्यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पारस देढियाविरुद्ध पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या ५० लाखांचा अपहार करुन वयोवृद्ध हॉटेल व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच पारसची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.