दिड कोटीच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन तिघांनी पलायन केल्याचे उघडकीस
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई – सुमारे दिड कोटीच्या हिर्यांचा अपहारप्रकरणी तीन हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हार्दिक जयंतभाई देसाणी, निकुंज आश्विन संघानी आणि उपेंद्र हिमतलाल दोशी अशी या तिघांची नावे असून ते तिघेही क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
संदीप तलशीभाई भदानी हे हिरे व्यापारी असून ते मिरारोड परिसरात राहतात. त्यांचा डी जे डायमंड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे कार्याय वांद्रे येथील बीकेसी, डायमंड मार्केटमध्ये आहे. याच कार्यालयातून त्यांचा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. राजेश आविया हे त्यांच्या परिचित हिरे दलाल असून गेल्या चार वर्षांपासून ते एकमेकांच्या परिचित आहेत. याच दरम्यान त्याने त्यांच्याकडून अनेकदा हिरे घेतले होते. त्याचे पेमेंट वेळेवर दिल्यामुळे त्यांना त्याच्यावर विश्वास होता.
गेल्या मे महिन्यांत त्यांनी त्यांची ओळख हार्दिक देसाणीसोबत करुन दिली होती. तो हिरे व्यापारी असून त्याच्याकडे हिरे खरेदी करणारे चांगले ग्राहक आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याशी व्यवहार करावा अशी शिफारस केली होती. त्यामुळे त्यांनी हार्दिकला मे ते जून 2024 या कालावधीत सुमारे दिड कोटी रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. यावेळी त्याने त्यांना 30 ते 45 दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही त्याच्याकडून त्यांना पेमेंट मिळाले नव्हते किंवा त्याने क्रेडिटवर घेतलेले हिरे परत केले नाही.
विचारणा केल्यानंतर तो त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेत होता. पार्टीकडून अद्याप पेमेंट आले नाही असे सांगत होता. मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. याकामी त्याला निकुंज संघानी आणि उपेंद्र दोशी यांनी मदत केली होती. ते दोघेही हिरे व्यापारी असून हार्दिकने त्यांच्या नावाने हिरे घेतले होते. मात्र या हिर्यांची परस्पर विक्री करुन त्यातून आलेल्या पेमेंटचा अपहार करुन संदीप भदानी यांची फसवणुक केली होती.
काही दिवसांनी त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. ते तिघेही हिरे घेऊन पळून गेल्याची खात्री होताच संदीप भदानी यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हार्दिक देसाणी, निकुंज संघानी आणि उपेंद्र दोशी यांच्याविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन तक्रारदार हिरे व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.