फ्लॅटच्या रजिस्ट्रेशननंतर तीस लाखांची मागणी करुन फसवणुक
फ्लॅटसाठी घेतलेल्या 81 लाखांचा अपहारप्रकरणी मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2025
मुंबई, – फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर अतिरिक्त तीस लाखांची मागणी करुन फ्लॅटसाठी घेतलेल्या 81 लाखांचा अपहार करुन एका व्यावसायिकाची मायलेकाने फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी मायलेकाविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुधीर किशोर मसंद आणि रश्मी किशोर मसंद अशी या मायलेकाचे नावे आहेत. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
40 वर्षांचे तक्रारदार मुजाहिदवली राहतवली खान हे अंधेरी परिसरात राहतात. त्यांचा शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा तर त्यांच्या पत्नीचा कपड्याचा व्यवसाय आहे. त्यांना प्रॉपटीमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या परिचित प्रॉपटी एजंट विजय शर्मा यांना चांगली प्रॉपटीबाबत सांगितले होते. काही महिन्यानंतर त्याने त्यांना सुधीर मसंद आणि रश्मी मसंद यांच्या मालकीचा फ्लॅट दाखविला होता. त्यांचा अंधेरीतील 90 फिट रोड, मक्का मशिदीजवळील कुरेशी कंपाऊंड, एव्हरशाईन कॉस्मिक अपार्टमेंटमध्ये अकराव्या मजल्यावर एक फ्लॅट होता. त्यांना पैशांची गरज असल्याने ते त्यांचा फ्लॅट स्वस्तात विक्री करत असल्याचे सांगितले होते. फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांच्यात फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा पावणेचार कोटीमध्ये सौदा पक्का झाला होता. या फ्लॅटवर कोणतेही कर्ज नव्हते. त्यामुळे त्यांच्यात फ्लॅटचे 65 लाख रुपये कॅश तर उर्वरित 3 कोटी 10 हजार धनादेशद्वारे देण्याचे ठरले होते.
ठरल्याप्रमाणे त्यांनी फ्लॅटसह टीडीएस, रजिस्ट्रेशनसाठी त्यांना कॅश आणि धनादेशद्वारे 81 लाख 32 हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंट त्यांनी जोगेश्वरीतील नोंदणी कार्यालयात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले होते. काही दिवसांनी त्यांनी फ्लॅटच्या कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र मसंद कुटुंबियांनी त्यांना कागदपत्रे दिली नाही. याच दरम्यान त्यांना या फ्लॅटवर गृहकर्ज असल्याची माहिती समजली होती. कर्जाची परतफेड न केल्यामुळे त्यांना बँकेची नोटीस आली होती. बँकेचे रिकव्हरी एजंट सतत त्यांच्याकडे येऊन पैशांबाबत विचारणा करत होते. याबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
काही दिवसांनी त्यांनी त्यांच्यासोबत करार रद्द केला. त्यांच्यापेक्षा जास्त पैसे दुसर्या व्यक्तीकडून मिळत असल्याने त्यांना तो फ्लॅट त्यांना विक्री करायचा नाही आहे असे सांगितले. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी परस्पर दुसर्या व्यक्तीशी फ्लॅटचा व्यवहार सुरु केला होता. त्यामुळे त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडे त्यांच्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचे पैसे परत केले नाही. उलट त्यांच्याकडे आणखीन तीस लाखांची मागणी केली होती. ही रक्कम दिल्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होणार नाही असे सांगितले होते.
अशा प्रकारे या दोघांनी फ्लॅटचे कागदपत्रे किंवा ताबा न देता फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केला. फ्लॅटसाठी अतिरिक्त तीस लाखांची मागणी करुन मुजाहिदवली खान यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सुधीर आणि रश्मी या मायलेकाविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.