मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
पालघर – लग्नासह प्रॉपटीसाठी सतत तगादा लावून त्यातून होणार्या वादाला कंटाळून एका महिलेची तिच्याच प्रियकराने मित्राच्या मदतीने हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठलाही पुरावा नसताना मृत महिलेच्या हातातील ममता नावाने गोंदलेल्या नावासह पायातील चांदीच्या जोडव्यामुळे या हत्येचा पर्दाफाश करण्यात मोखाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी प्रियकरासह मित्रांना दिड महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. सुनिल ऊर्फ गोविंद यादव आणि महेश रविंद्र बडगुजर ऊर्फ विक्की अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत महिलेचे ममता असून तिचे सुनिलसोबत प्रेमसंबंध असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
७ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरंगाव,, खोडाळा ते कसाराकडे जाणार्या रोडवरील वैतरणा नदीजवळ एका ३० ते ३५ वयोगटातील महिलेचा पोलिसांना मृतदेह सापडला होता. या महिलेचे मुंडके कोणत्यातरी धारदार शस्त्राने धडा वेगळे करुन मारेकर्यांनी हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन पलायन केले होते. या घटनेनंतर मोखाडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या हत्येच्या घटनेची पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते, मोखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई, रविंद्र वानखेडे, पोलीस हवालदार राकेश पाटील, कपिल नेमाडे, संजय धांगडा, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, नरेंद्र पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस शिपाई वाल्मिक पाटील, रोहित तोरस्कर यांनी संयुक्तपणे तपास सुरु केला होता.
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलीस पथकाने नंदूरबार, धुळे, जळगाव, ठाणे, कल्याण, नाशिक तसेच महाराष्ट्रातील इतर शहरात तिचे छायाचित्र पाठविले होते. तिच्या उजव्या हातावर ममता असे गोंदलेले होते. पायात चांदीचे जोडवे, त्यात एसडीएस असा मार्क होता. याच जोडव्यावरुन पोलिसांनी धुळे येथील शिरपूरच्या सुधाकर दिपचंद सोनार यांच्या दिक्षा ज्वेलर्सची माहिती प्राप्त झाली होती. या ज्वेलर्स मालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता अशा प्रकारचे जोडवे पावरा समाजाचे महिला वापरत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या पथकाने शिरपूर तालुक्यातील मतदार यादी तपासली असता ४४५ क्रमांकावर ममता नावाच्या एका महिलेची माहिती सापडली. तिच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढून पोलिसांनी परिसरातील पोलीस पाटील यांच्या मदतीने व्हॉटअप ग्रुप तयार केला होता. त्यातून पोलिसांना ही महिला धुळे येथील शिरपूरची असल्याचे समजले होते. ही माहिती मिळताच पोलिसांनी सुनिल ऊर्फ गोविंद यादव या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत सुनिल हा उत्तरप्रदेशच्या महाराजगंज, खेंचाचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. त्याचे ममतासोबत प्रेमसंबंध होते. सुनिलनंतर त्याचा मित्र महेश रविंद्र बडगुजर ऊर्फ विक्की यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनीच ममताची हत्या केल्याची कबुली दिली. ममता ही सुनिकडे लग्नासाठी सतत तगादा लावत होती. त्याची प्रॉपटी नावावर करण्यासाठी तिने त्याच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली होती. त्यातून त्यांच्यात प्रचंड वाद होऊ लागले होते. या वादातून तिला कायमची संपविण्यासाठी सुनिलने महेशची मदत घेतली होती. गोड बोलून त्याने तिला लोणावळा येथे फिरायला जायचे आहे असे सांगून आणले. त्यानंतर पालघर जिल्ह्यांतील मोजे कारेगाव हद्दीत इटिंगा कारमध्येच त्यांनी तिची गळा आवळून हत्या केली. तिची ओळख पटू नये म्हणून त्यांनी तिचे मुंडके धडापासून वेगळे करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यांच्या या कबुलीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर या दोघांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्येचा कुठलाही पुरावा नसताना केवळ ममता नावासह चांदीच्या जोडव्यातून मृत बेवारस महिलेची ओळख पटवून पोलिसांनी दोन्ही मारेकर्यांना शिताफीने अटक केली. त्यामुळे या आरोपींना अटक करुन हत्येच्या गुन्ह्यांची उकल करणार्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.