प्रियकरावर काळी जादू केल्याची बतावणी करुन फसवणुक
तरुणीच्या तक्रारीवरुन भामट्या मांत्रिक ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मार्च 2025
मुंबई, – प्रियकरावर एका तरुणीने काळी जादू केली आहे, जादूटोणा आणि पूजा करुन ही काळी जादू दूर करुन त्यांच्यातील रिलेशन पुन्हा पुर्ववत करतो असे सांगून एका तरुणीची अज्ञात मांत्रिक सायबर ठगाने साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून वाकोला पोलिसांनी या अज्ञात सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे. प्रियकराला काळी जादूपासून मुक्त करण्यासाठी सोशल मिडीयावरील या भामट्या मांत्रिकाला संपर्क साधणे या तरुणीला चांगलेच महागात पडले आहे.
32 वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियासोंबत सांताक्रुज येथे राहते. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत तिची ऋषीकेश नावाच्या एका तरुणासोबत ओळख झाली होती. तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या ठाण्यात राहत होता. त्यांची चांगली मैत्री होती. त्यांचे एकमेकावर प्रेम होते. अनेकदा ती त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याला कोणाचे तरी वारंवार फोन येत होते. मात्र तो फोन रिसीव्ह करत नव्हता. त्यामुळे तिला त्याचे दुसर्या मुलीशी अफेसर असल्याचा संशय होता. याच दरम्यान तिला सोशल मिडीयावर स्वतच्या रिलेशनशीप सेच करिअरबाबत जाणून घेण्याबाबत एक जाहिरात दिसली होती. त्यामुळे तिने संबंधित मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने तिला कॉल करुन तिची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.
तिच्याकडून ऋषिकेशबाबत माहिती समजताच त्याने तिला त्याच्यावर एका मुलीने काळी जादू केली आहे. तो तिच्यासोबत राहण्यास इच्छुक नाही. त्याला तुझ्यासोबत राहायचे आहे. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसला आणि तिने त्याला काहीतरी उपाय करण्यास सांगितले. यावेळी त्याने तिला त्याच्यावरील काळी जादू कॅडल जाळून काढून टाकतो असे सांगितले. त्यासाठी त्याने तिला ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले होते. त्यामुळे तिने त्याला काही पैसे ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी तो तिला विविध कारण सांगून तिच्याकडून आणखीन पैशांची मागणी करु लागला. तिनेही त्याला टप्याटप्याने 53 व्यवहाराद्वारे 3 लाख 47 हजार रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवून तिच्या आयुष्यात काहीच बदल झाला नव्हता. ऋषिकेशमध्येही तिला काहीच सुधारणा दिसली नाही.
याबाबत विचारणा केल्यानंतर तो तिला पूजा सुरु असल्याचे सांगून तिला एकदा राजस्थानात यावे लागेल असे सांगत होता. मात्र तिने राजस्थानात न जाता त्याला मुंबईत येण्यास सांगितले. मात्र तो मुंबईत आला नाही. प्रियकरावर एका तरुणीने काळी जादू केली आहे असे सांगून त्याने तिच्याकडून सुमारे साडेतीन लाख उकाळले होते, मात्र त्यांच्या रिलेशनमध्ये काही बदल झाला नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने संबंधित तांत्रिक सायबर ठगाविरुद्ध वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड काढले जात असून या रेकॉर्डवरुन त्याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.