मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, दि. २० (प्रतिनिधी) – गेल्या तीन दिवसांत आठ विविध कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून चोरट्या मार्गाने आणलेले विदेशी चलनासह सोने आणि महागड्या आयफोन सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी जप्त केला आहे. त्यात पावणेतीन कोटी रुपयांच्या तीन किलो सोन्यासह चार आयफोन आणि एक लाख अठरा हजार तीनशेपन्नास रुपयांच्या विदेशी चलनाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी अकरा प्रवाशांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांत विदेशातून सोने तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा सोने तस्कराविरुद्ध सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. विदेशातून विशेषता आखाती देशातून येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात होती. अशाच एका कारवाईत सीमा शुल्क विभागाने एका भारतीयला १२९२ ग्रॅम वजनाच्या सोन्यासह ताब्यात घेतले होते. हा प्रवाशी दम्मनहून मुंबईत एअर इंडियाच्या विमानाने आला होता. यावेळी त्याच्याकडील बॉक्समध्ये या अधिकार्यांना २४ कॅरेटचे सहा गोल्ड बार जप्त केले. दुसर्या कारवाईत दोन भारतीय प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून या अधिकार्यांनी ७५० ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले. तिसर्या कारवाईत एअर इंडियाच्या विमानातून कुवेतहून आलेल्या अन्य दोन भारतीय प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून ३७० ग्रॅम वजनाचे जप्त केले. चौथ्या कारवाईत एका महिलेला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिने तिच्या चप्पलमधून लपवून आणलेले २४० ग्रॅम वजनाचे सोनसाखळी या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. ही महिला दुबईहून स्पायजेटच्या विमानातून मुंबईत आली होती. पाचव्या कारवाईत शारजाहून आलेल्या अन्य एका प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १९५ ग्रॅम वजनाचे गोल्ड डस्ट आणि चार महागडे आयफोन या अधिकार्यांनी जप्त केले. त्यांनी ते सोने आणि आयफोन अंतरवस्त्रातून लपवून आणल्याचे उघडकीस आले. अन्य दोन कारवाईत दुबईहून आलेल्या एका प्रवाशांकडून १७८ ग्रॅम सोने तर मुंबईहून दुबईला जाणार्या तीन प्रवाशांकडून या अधिकार्यांनी १ लाख १८ हजार ३५० रुपयांचे विदेशी चलन जप्त केले आहेत. या तिन्ही प्रवाशांना नंतर सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले होते. या आठ कारवाईत या अधिकार्यांनी अकरा भारतीय प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ किलो सोने, चार आयफोन आणि विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे.