शिवीगाळ करुन मारहाण करणे महिला प्रवाशाला महागात पडले
सुरक्षा तपासणी न करता सीआयएसएफच्या महिलेशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, – भुवलेश्वरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका महिलेने सुरक्षा तपासणी न करता विमानतळाच्या आत प्रवेश करताना एका केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला कर्मचार्यांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी रितपूर्णा पुरुषोत्तम साहू या महिलेविरुद्ध सहार पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे व अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. कर्तव्य बजाविणार्या एका सीआयएसएफच्या महिलेशी हुज्जत घालणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
पूजा विनोद कुमार ही अंधेरी येथे राहत असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी ती नेहमीप्रमाणे कामावर हजर झाली. होल्डिंग एरिया येथे कर्तव्य बजावत असताना दुपारी एक वाजता तिथे एक महिला आली. यावेळी डीएमडीमधून प्रवेश केल्यानंतर बीप आस आवाज आल्याने तिने तिचे बूट काढण्यास सांगितले. यावेळी तिने बूट काढण्यास नकार दिला. त्यानंतर तिने तिच्याशी वाद घालून प्रचंड गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार वरिष्ठ अधिकार्याच्या निदर्शनास येताच त्यांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने सुरक्षा तपासणी न करता विमानतळाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला पूजासह इतर महिला कर्मचार्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागाच्या भरात तिने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली होती. या घटनेनंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी पूजा कुमारच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रितूपर्णाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे तसेच अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. रितूपर्णा ही भुवनेश्वर येथील भुवनेश्वर ओल्ड टाऊन, भिमतांजी फेज दोन, एचबी कॉलनीत राहते. मंगळवारी ती मुंबईतून भुवनेश्वरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. त्यावेळेस हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.