साडेपाच लाखांच्या चोरीप्रकरणी मोलकरीण तरुणीला अटक
सीसीटिव्ही फुटेजबाबत खोटी माहिती सांगताच चोरीची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 एप्रिल 2025
मुंबई, – कांदिवलीतील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरात काम करताना सुमारे साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे वस्तू आदी मुद्देमाल चोरी केल्याप्रकरणी साक्षी मुकेश येरापल्ले या 29 वर्षांच्या मोलकरीण तरुणीला समतानगर पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला तिने चोरी केली नसल्याचे सांगून ती मी नव्हेच असा पवित्रा घेतला, मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये चोरी करताना दिसत असल्याचे सांगताच तिने ही चोरी केल्याची कबुली देताना पाच लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले, तिने तिचे आश्वासन न पाळल्यामुळे व्यावसायिकाच्या पत्नीने तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती.
वर्षा सुरज आजगावकर ही महिला कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहते. तिच्या पतीचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत तिच्या घरी साक्षी ही घरकाम करत होती. एप्रिल महिन्यांत तिचे संपूर्ण कुटुंबिय रायगडच्या श्रीवर्धन येथील गावी गेले होते. याच दरम्यान 3 एप्रिल 2024 रोजी त्यांच्या घरी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान झाल्याने ते त्याच इमारतीमध्ये दुसर्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी गेले होते. सामान शिफ्ट करताना त्यांना कपाटातील काही कॅश, सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले होते. मात्र नंतर तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.
ऑक्टोंबर महिन्यांत तिच्या मुलाची सोन्याची चैन चोरीस गेली होती. घरी सर्वत्र शोध घेऊन ती सोन्याची चैन सापडली नाही. या घटनेनंतर साक्षीने कामावर येणे बंद केले होते. तिने तिच्याकडे विचारणा केली असता तिने तिला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिच्याकडे सोन्याची चैनबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र तिने तिला उडवाउडवीचे उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी वर्षा आजगावरकरने चोरी करताना ती सीसीटिव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर तिने सोन्याची चैन चोरी केल्याची कबुली दिली.
तिनेच तिच्या घरातील सुमारे साडेपाच लाखांचे सोन्याचे विविध दागिने आणि चांदीच्या वाट्या, चैन, कमरपट्टा, छल्ला आदी चोरी केल्याचे सांगून तिला पाच लाख रुपये परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र तिने तिला पाच लाख रुपये दिले नाही. या घटनेनंतर वर्षा आजगावकरने तिच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.