महिलेच्या विनयभंगप्रकरणी वॉण्टेड डिलीव्हरी बॉयला अटक

पॅण्ट काढून महिलेसमोर नकोसे कृत्य केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – गिरगाव परिसरात राहणार्‍या एका महिलेचा विनयभंग करुन पळून गेलेल्या वॉण्टेड डिलीव्हरी बॉयला अखेर व्ही. पी रोड पोलिसांनी गावदेवी परिसरातून अटक केली. शाहरुख मोहम्मद शेख असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. डिलीव्हरीचे सामान देण्यासाठी आल्यानंतर त्याने तक्रारदार महिलेसमोरच पॅण्ट काढून नकोसे कृत्य करुन विनयभंग केल्याचा त्याच्यावर आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

28 वर्षांची तक्रारदार महिला गिरगाव परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. 21 मार्चला तिने एका खाजगी कंपनीतून काही सामानाची ऑर्डर दिली होती. या ऑर्डरनंतर तिला शाहरुखने दोन वेळा कॉल करुन तिच्या पत्त्याविषयी विचारणा केली होती. तिने त्याला फोनवरुन तिचा पत्ता सांगितला होता. रात्री तो डिलीव्हरीचे सामान घेऊन तिच्या घरी आला होता. यावेळी त्याला तिच्या घरात कोणी नसल्याचे वाटले, त्यामुळे त्याने तिच्यासमोरच स्वतची पॅण्ट काढून नकोसे कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. या घटनेनंतर तिने तिच्या पतीला ही माहिती सांगितली. या माहितीनंतर तिच्या पतीला त्याला पकडून बेदम मारहाण केली होती.

याच दरम्यान तो तेथून पळून गेला होता. घडलेल्या प्रकाराची त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करुन तक्रार केली होती. या तक्रारीची कंपनीच्या अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत डिलीव्हरी बॉय शाहरुख शेख याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो हजर राहिला नाही. त्यामुळे या महिलेने त्याच्याविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.

ही शोधमोहीम सुरु असताना शाहरुख हा गावदेवी येथील केनेडी ब्रिजजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून शाहरुखला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तक्रारदार महिलेचा विनयभंग केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक करुन रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर केले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page