मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – भीक मागण्याचा बहाणा करुन उघड्या घरात प्रवेश करुन चोरी करणार्या एका टोळीचा घाटकोपर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या टोळीतील दोन सराईत तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. सीमा जॉन्सन पवार आणि दिव्या पोपट पवार अशी या दोघींची नावे असून त्या दोघीही सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे सुमारे 75 हजाराचे आठ मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
गोकुळ बाळासाहेब शिंदे हे घाटकोपर येथे राहत असून त्यांचा कुर्ला येथील कमानी, शिवशक्ती चाळीत स्वतचा सलून आहे. 31 मार्चला दुपारी त्यांच्या घरात प्रवेश अज्ञात व्यक्तीने त्यांचा 85 हजाराचा एक आयफोन आणिण साडेचार हजारााचा ओप्पो फोन असे दोन 89 हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश पासलवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते, पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास तिरमारे, पोलीस हवालदार देवार्डे, कंक, बोराडे, पोलीस शिपाई नागरे, कवळे आणि भिवसणे यांनी तपास सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता तिथे तीनजण भीक मागताना दिसून आले. या तिन्ही महिलांनी हा गुन्हा केल्याची शक्यता वर्तवून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता. जवळपास तीसहून अधिक सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर तांत्रिक माहितीवरुन सीमा आणि दिव्या या दोन्ही 20 वर्षांच्या तरुणींना टिळकनगर पाईपलाईन रोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघींची चौकशी केली असता त्यांनीच गोकुळ शिंदे यांच्या घरात प्रवेश करुन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. दिव्या पवार आणि सीमा पवार या दोघीही मूळच्या संभाजीनगरच्या रहिवाशी असून सध्या विद्याविहार येथील टिळकनगर पाईपलाईन बाजूकडील रोड परिसात राहतात.
ही टोळी भीक मागण्याचा बहाणा करुन उघड्या घरात प्रवेश करतात. त्यानंतर घरातील मोबाईलसह इतर वस्तू घेऊन पलायन करतात. या दोघींच्या अटकेने चोरीच्या काही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून चोरीचे आठ मोबाईल जप्त केले आहेत. संबंधित मोबाईल मालकांचा शोध घेऊन त्यांचे मोबाईल परत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या दोघींनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.