मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2025
मुंबई, – कारसाठी घेतलेल्या सुमारे सतरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी बळीराम लोखंडे ऊर्फ बंटी या कार डिलरविरुद्ध बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वी बळीराम ऊर्फ बंटी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे कार लोनसाठी अर्ज केला नसताना तक्रारदारासह त्यांच्या पत्नीची बोगस स्वाक्षरी करुन बंटीने एका खाजगी बँकेतून कर्ज मंजुर करुन या पैशांचा परस्पर अपहार केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत बँकेत काही अधिकारी सामिल आहेत का याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.
रवि राजनाथ जयस्वार हे विद्याविहार येथे राहत असून धारावी सहकारी पतपेढीत कामाला आहेत. बंटी हा त्यांच्या परिचित असून गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखतात. बंटीचा बोरिवलीतील चिकूवाड, दादरकर कंपाऊंडमध्ये श्री गणेश कार केअर नावाची कार खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत रवि जयस्वार हे त्याच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यासाठी एक चांगली सेकंहॅण्ड कार असल्यास सांगण्यास सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना काही कार दाखविले होते. त्यातील टाटा सफारी नावाची कार त्यांना आवडली होती. या कारची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर त्यांनी ती कार खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्यात कारच्या खरेदी-विक्रीचा 21 लाखांमध्ये सौदा झाला होता. या कारचे मूळ कागदपत्रासह आरसी बुक, वाहन इन्शुरन्सचे कागदत्रे त्याने त्यांना मोबाईलवरुन दाखविली होती. त्यांचा विश्वास बसावा म्हणून बंटीने त्यांना 90 टक्के कर्ज देतो असे सांगितले होते.
काही दिवसांत बंटीने त्यांच्या नावाने एका खाजगी बँकेतून 15 लाख 78 हजार 486 रुपयांचे कर्ज घेतले होते. विशेष म्हणजे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने कुठल्याही कर्जाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नव्हती. तरीही त्याने त्यांचे बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून कर्ज मिळविले होते. त्यापूर्वी त्याने त्यांच्याकडून कारसाठी तीन लाख रुपये घेतले होते. अशा प्रकारे त्यांनी बंटीला कारसाठी 18 लाख 78 हजार 486 रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र त्याने कारचा ताबा दिला नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कारचा व्यवहार रद्द करुन बंटीकडून पैशांची मागणी सुरु केली होती.
मात्र बंटी हा पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचा मोबाईल बंद येत होता. या घटनेनंतर त्यांनी बंटी ऊर्फ बळीराम लोखंडे याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बंटी हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर गुन्हे केले आहेत का, कर्जासाठी अर्ज केले नसताना बंटीने रवि जयस्वार व त्यांच्या पत्नीचे बोगस स्वाक्षरी करुन बँकेतून कर्ज मिळविले होते, त्यामुळे या गुन्ह्यांत संबंधित बँक अधिकारी आणि कर्मचार्यांचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.