रॉबरीचा बनाव करुन 45 लाखांचा अपहार करुन फसवणुक
46 वर्षांच्या नोकरासह दोन सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – नागपाडा येथे एका व्यापार्याला देण्यासाठी दिलेली 45 लाखांची कॅश अज्ञात व्यक्तींनी मारहाण करुन रॉबरी केल्याची बनाव करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका नोकरासह त्याच्या दोन सहकार्याविरुद्ध कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद फरहान मोहम्मद शफीक अन्सारी, फैजल कुरेशी आणि शारीख कुरेशी अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही पळून गेले असून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.
मोहम्मद इम्रान इसा खान हे भंगार व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला येथे राहतात. त्यांचा कुर्ला येथील एलबीएस मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज कुटीर मंडळात एक शॉप आहे. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून त्यांच्या वडिलांनंतर ते गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्याकडे गेल्या आठ वर्षांपासून मोहम्मद फरहान हा कामाला असून त्याच्यावर बँकेत पैसे जमा करणे, व्यवसायाचे पैसे ग्राहकांसह त्यांचे व्यावसायिक मित्र मिहीरभाई यांना देण्याची जबाबदारी होती. 20 डिसेंबर 2024 त्यांनी व्यवसायाचे 45 लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम त्यांना मिहीरभाई यांना द्यायची होती. त्यामुळे त्यांनी मोहम्मद फरहानला 45 लाख रुपये मिहीरभाई यांना देण्यास सांगितले होते.
ठरल्याप्रमाणे मोहम्मद फरहान ही रक्कम रक्कम मिहीरभाई यांना नागपाडा येथे देण्यासाठी शॉपमधून निघून गेला होता. ही रक्कम घेऊन जाताना आग्रीपाडा परिसरात त्याला काही अज्ञात व्यक्तीने मारहाण करुन त्याच्याकडील 45 लाखांची कॅश घेऊन पलायन केले होते. घडलेला प्रकार त्याने मोहम्मद इम्रान यांना सांगितला होता. या घटनेनंतर त्यांनी आग्रीपाडा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी दखल घेत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तपासादरम्यान अशा प्रकारची रॉबरीची कुठलीही घटना घडली नसल्याचे उघडकीस आले होते. मोहम्मद फरहानने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने रॉबरीचा बनाव करुन 45 लाखांची चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच मोहम्मद इम्रान यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांची भेट घेतली होती. त्यांना घडलेला प्रकार सांगून मोहम्मद फरहानसह इतर दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी मोहम्मद फरहान, त्याचे दोन सहकारी फैजल कुरेशी आणि शारीख कुरेशी या तिघांविरुद्ध रॉबरीचा बनाव करुन 45 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.