मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – बंद खाते बंद झाल्याचा मॅसेजसह केवायसी अपडेटसाठी बोगस लिंक पाठवून अज्ञात सायबर ठगाने एका सहाय्यक दिग्दर्शकाची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. लिंकवर बँक खात्यासह पॅनकार्ड आणि आधारकार्डची माहिती अपलोड केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 3 लाख 39 हजाराचा अपहार झाला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.
चेतन हेमांग देसाई हे सहाय्यक दिग्दर्शक असून ते अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, कृष्णा-कावेरी अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे एका खाजगी बँकेत खाते असून ते अनेकदा ऑनलाईन व्यवहार करतात. शनिवार 5 एप्रिलला त्यांना एक अज्ञात व्यक्तीने मॅसेज पाठवून त्यांचा बँक अकाऊंट बंद झाला आहे. त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला कॉल केला होता. यावेळी त्याने त्यांचे केवायसी अपडेट नसल्याने त्यांचे बँक खाते बंद झाले आहे. त्यांनी तातडीने केवायसी अपडेट करावे असे सांगून त्याने त्यांना एक लिंक पाठविली होती.
बँक खाते बंद झाल्याचे समजून त्यांनी ती लिंक ओपन करुन त्यात त्यांच्या बँक खात्यासह पॅन, आधारकार्डची माहिती अपडेट करुन अपलोड केली होती. ही माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना चार वेगवेगळे मॅसेज प्राप्त झाले होते. या ऑनलाईन व्यवहारातून त्यांच्या बँक खात्यातून 3 लाख 39 हजार 990 रुपयांचे डेबीट झाले होते. केवायसी अपडेटच्या नावाने अज्ञात सायबर ठगांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांसह बँकेत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा ओशिवरा पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.