मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 एप्रिल 2025
मुंबई, – खार परिसरात राहणार्या एका व्यावसायिक महिलेच्या घरी हिरेजडीत दागिन्यांच्या चोरीप्रकरणी दोन महिला मोलकरणीला खार पोलिसांनी अटक केली. दिपा शिवशंकर यादव आणि वैशाली अनिल नलावडे अशी या दोघींची नावे असून चोरीच्या याच गुन्ह्यांत त्या दोघीही पोलीस कोठडीत आहे. या दोघींकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.
मीना अनिल गगवाणी ही 56 वर्षाची महिला खार येथे राहत असून तिचा स्वतचा व्यवसाय आहे. तिच्याकडे सावित्री आणि वैशाली असे दोन नोकर असून ते दोघेही जेवण बनविण्याचे काम करतात. तिला आणखीन एका महिलेची घरकामासाठी गरज होती. त्यामुळे तिने एका वेबसाईटवर एका एजन्सीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एका वेबसाईटवरुन तिच्या घरी दिपा यादवला पाठविण्यात आले होते. 26 जानेवारीला दिपा ही तिच्या घरी आली होती. तिची सविस्तर माहिती आणि चौकशी करुन तिने तिला कामावर ठेवले होते.
सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजता या कालावधीत काम करुन ती तिच्या घरी निघून गेली होती. त्यानंतर ती कामावर आली नाही. त्यामुळे तिने संबंधित एजन्सीला कॉल केला होता. या कॉलनंतर 28 जानेवारीला दिपा ही पुन्हा तिच्या घरी कामावर हजर झाली होती. त्याच दिवशी तिची सासू वंदना गगवाणी हिला तिच्या रुमच्या कपाटातून 21 हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने मीना गंगवाणी हिला हा प्रकार सांगितला. तिने घरी काम करणार्या सावित्री, वैशाली आणि दिपाकडे चौकशी केली होती, मात्र त्यांनी ते पैसे घेतले नसल्याचे सांगितले.
याच दरम्यान दिपा ही कामावर सतत गैरहजर राहत असल्याने तिने एजन्सीकडे तिची तक्रार करुन दुसर्या महिलेला कामावर पाठविण्याची विनंती केली होती. 20 फेब्रुवारी ते 13 मार्च 2025 या कालावधीत मीना गगवाणी ही विदेशात सहलीसाठी गेली होती. 25 मार्चला तिने कपाटातील काही हिरेजडीत दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला कपाटातील हिरेजडीत दागिने आणि कॅश असा सुमारे पावणेचार लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर तिने खार पोलिसांत चोरीची तक्रार करुन दिपावर चोरीचा संशय व्यक्त केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना शनिवारी दिपासह वैशाली या दोघींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या दोघींनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर दिपा यादव आणि वैशाली नलावडे या दोघींना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघींनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.