हेरॉईनचा पुरवठा करणार्या मुख्य सप्लायरला उत्तरप्रदेशातून अटक
अटक आरोपींची संख्या पाचवर; ड्रग्जचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 मार्च 2025
मुंबई, – मुंबईतील ड्रग्ज तस्करी करणार्या हेरॉईनचा पुरवठा करणार्या एका मुख्य सप्लायरला बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने उत्तरप्रदेशातून अटक केली. मोहम्मद अली असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांत अटक झालेल्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत परवेज आलम कासिम अन्सारी, इरफान जरीन खान, शोएब मेहवाब अन्सारी आणि अभिषेक रामजीलाल कुमार या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी 472 ग्रॅम वजनाचा 47 लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. या चौघांच्या अटकेनंतर मोहम्मद अली पळून गेला होता, अखेर त्याला तीन महिन्यानंतर उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जानेवारी महिन्यांत बोरिवलीतील जयवंत सावंत मार्ग, सुधीर फडके ब्रिजजवळ परवेज तर नालासोपारा येथून इरफान या दोघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली होती. तपासात ते स्थानिक परिसरात ड्रग्जची विक्री करत होते. या दोघांकडून पोलिसांनी 38 लाखांचे हेरॉईन जप्त केले होते. त्यांच्या चौकशीतून मिरारोड येथील काशिमिरा, ऑक्ट्रॉय नाका, शालभद्र ग्राम इमारतीमध्ये त्यांचे इतर दोन सहकारी राहत असून तेच हेरॉईनचा पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या पथकाने तिथे छापा टाकून शोएब अन्सारी आणि अभिषेक कुमार या दोघांना ताब्यात घेतले होते. यावेळी शोएबकडून पोलिसांनी 17 लाख 40 हजार रुपयांचा 174 ग्रॅम तर अभिषेककडून 21 लाखांचे 210 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते.
या चौघांचा बॉस मोहम्मद अली होता, मात्र त्यांच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना मोहम्मद अली हा उत्तरप्रदेशात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर बोरिवली पोलिसांची एक टिम उत्तरप्रदेशला गेली होती. सलग नऊ दिवस वेेगवेगळ्या ठिकाणी पाळत ठेवून पोलिसांनी मोहम्मद अलीला कुल्लू मंडी येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तपासात या टोळीचा तोच म्होरक्या असून तो बूटातून हेरॉईनची तस्करी करत होता. अटकेच्या भीतीने तो रुरकी, हरिद्वार, सिकरोड, भगवानपुरा, देहरादून, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात राहत होता. अखेर तीन महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. गुरुवारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केल्यानंतर त्याला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक पाचही आरोपी उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.