दर्ग्याच्या मालकी हक्कावर 46 वर्षांच्या व्यक्तीची हत्या

इतर दोनजण जखमी तर हत्येप्रकरणी चौघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2025
मुंबई, – दर्ग्याच्या मालकी हक्कावर एकाच कुटुंबियातील तिघांवर दुसर्‍या गटातील चौघांनी तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात शाकीरअली शेख या 46 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर एका महिलेसह दोनजण जखमी झाले होते. जखमी महिला नूरजहाँ हिच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून चारही आरोपींना अटक केली आहे. इम्रान नासीर शेख, उस्मानअली ऊर्फ फारुख जाकीरअली शेख, जाकीर अली शेख आणि फातिमा ऊर्फ कायनात इम्रान खान अशी या चौघांची नावे असून हत्येच्या याच गुन्ह्यांत या चौघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजता वांद्रे येथील बडी मशिदीजवळील मौलाना बाबा सुफी सुल्तान नक्सबंदी दर्ग्याच्या मागील बाजूस घडली. याच परिसरातील जामा मशिद, मौलाना बाबा लेनमध्ये अफजलअली पिता आझमअली शेख हा 27 वर्षांचा तरुण त्याच्या कुटुंबियंसोबत राहतो. याच परिसरातील दर्ग्याच्या मालकी हक्कावरुन शेख आणि खान कुटुंबियांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु होता. याच वादातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. गुरुवारी रात्री साडेआठ वाजता या दोन्ही कुटुंबियांमध्ये पुन्हा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात चारही आरोपींनी अफजलअलीचे चुलते शाकीर अली शेख यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातून आरोपींनी शाकीरअली यांच्यावर चाकूने वार केले होते.

हल्ल्यादरम्यान अफजलअलीची आई नूरजहाँ अजमाली शेख ऊर्फ शिरीन आणि नातेवाईक खिजारअली अन्वर अली संडोले ऊर्फ मोनू यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या चौघांनी त्यांच्यावरही तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात शाकीरअली, नूरजहाँ आणि खिजारअली हे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी तिघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे शाकीरअली यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर नूरजहाँ यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही माहिती प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अफजलअलीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस येताच त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खान कुटुंबातील चौघांविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्न आणि अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या इम्रान खान, उस्मानअली शेख, जाकीरअली शेख आणि फातिमा खान अशा चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page