बालविवाह केलेल्या अल्पवयीन पत्नीवर लैगिंक अत्याचार
जुळ्या मुलीच्या जन्मानंतर दोन्ही कुटुंबियांविरुद्घ गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 एप्रिल 2025
मुंबई, – बालविवाह केलेल्या सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याचा प्रकार अंधेरी परसिरात उघडकीस आला आहे. या मुलीने अलीकडेच जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर पिडीत मुलीच्या आई-वडिलांसह आरोपी पतीसह त्याच्या कुटुंबातील चारजण अशा सहाजणांविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पोक्सो आणि बालविवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत सर्व आरोपींना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पिडीत मुलगी ही सतरा वर्षांची अल्पवयीन मुलगी आहे. ती अल्पवयीन असल्याचे माहित असताना गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यांत तिच्या आई-वडिलांनी विष्णू नावाच्या एका तरुणासोबत बालविवाह लावला होता. लग्नानंतर ती तिच्या पतीसोबत तिच्या सासरी गेली होती. तिथे त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. प्रसुतीसाठी तिला नंतर कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच तिने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता.
प्रसुतीदरम्यान कूपर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे समजले होते. त्यानंतर ही माहिती हॉस्पिटल प्रशासनाने डी. एन नगर पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी पिडीत मुलीसह तिच्या पालकांची तसेच आरोपी पतीसह त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान पिडीत आणि आरोपी पतीच्या कुटुंबियांनी ती अल्पयीन असल्याचे माहित असताना तिचा बालविवाह लावून दिला होता. त्यातून ती गरोदर राहिली आणि तिने जुळ्या मुलींना जन्म दिला होता.
हा प्रकार उघडकीस येताच पोलीस उपनिरीक्षक अर्चना खळदकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील सहाजणांविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात पिडीत मुलीच्या आई-वडिलांसह आरोपी पती, त्याचे आई-वडिल व इतर नातेवाईकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.