सतरा वर्षांच्या मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपीस अटक

सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरलची धमकी दिली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
13 एपिल 2025
मुंबई, – सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्याच 19 वर्षांच्या आरोपी मित्राला शनिवारी साकिनाका पोलिसांनी अटक केली. सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने मृत मुलीला ब्लॅकमेल केले होते, या ब्लॅकमेलसह बदनामीच्या भीतीने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

24 वर्षांचा तक्रारदार तरुण अंधेरीतील साकिनाका परिसरात राहतो. मृत सतरा वर्षांची मुलगी त्याची लहान बहिण आहे. याच परिसरात आरोपी राहत असून त्याच्या बहिणीचे त्याच्यासोबत मैत्री होती. ते दोघेही सोशल मिडीयासह कॉलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. 2 मे 2023 ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत त्याने तिचे काही अश्लील फोटो पाठविण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही त्याला तिचे काही अश्लील फोटो पाठविले होते. गेल्या काही दिवसांपासून तो तिला तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिला ब्लॅकमेल करुन तिची बदनामीची धमकी देत होता. या धमकीमुळे ती प्रचंड मानसिक तणावात होती. बदनामीच्या भीतीने तिने अलीकडेच तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

तिच्या आत्महत्येनंतर तिच्या तक्रारदार भावाला हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्याने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे आरोपी मित्राविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपी तरुणाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह सोशल मिडीयावर अश्लील व्हायरल करण्याची धमकी देऊन बदनामीची धमकी देऊन त्याच्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला शनिवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page