सिनेअभिनेता सलमान खानला पुन्हा जिवे मारण्याची धमकी
घरात घुसून मारहाणीसह कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाहीतर तोवर पुन्हा सलमान खानला अज्ञात व्यक्तीकडून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक कंट्रोल रुममध्ये कॉल करणार्या व्यक्तीने सलमानला त्याच्या घरात घुसून मारहाण तसेच बॉम्बस्फोटाने त्याची कार उडवून देण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध वरळी पोलिसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोदविला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली, त्या मोबाईल क्रमांकाची माहिती काढून आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या गोळीबारानंतर दोन्ही शूटर बाईकवरुन पळून गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच दोन्ही शूटरसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात मोहम्मद रफिक चौधरी, विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई आणि हरपाल सिंग यांचा समावेश होता. त्यापैकी अनुजकुमार थापन याने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे इतर पाच आरोपींविरुद्ध 8 जुलै 2024 रोजी पोलिसांनी 1700 पानाचे आरोपपत्र सादर केले होते.
या गोळीबाराला एक वर्ष पूर्ण होत नाहीतर तोवर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या कंट्रोल रुममला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला ोता. या व्यक्तीने सलमान याच्या घरात घुसून मारहाण करण्याची तसेच बॉम्ब ब्लास्टने त्याची उडविण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने कॉल बंद केला होता. या धमकीनंतर पोलीस उपनिरीक्षक संजय काशिनाथ शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना धमकीची ही माहिती सांगितली होती.
वरिष्ठांच्या आदेशानंतर संजय शिर्के यांनी वरळी पोलीस ठाण्यात धमकी देणार्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरुन ही धमकी देण्यात आली होती, तो मोबाईल कोणाचा आहे, त्याने कोठून ही धमकी दिली होती. त्याचे कॉल रेकॉर्ड काढण्यात येत आहे. या गुन्ह्यांचा वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.