मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – विदेशातून पोटातून कोकेन घेऊन आलेल्या एका विदेशी नागरिकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. त्याच्या पोटातून या अधिकार्यांनी काही कॅप्सुल काढून त्यात असलेला 785 ग्रॅम वजनाचा कोकेन जप्त केला आहे. या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 7 कोटी 85 लाख रुपये इतकी आहेत. या प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने कस्टम अधिकार्यांनी अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बुधवारी विदेशातून एक विदेशी प्रवाशी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला विमानतळाबाहेर जाण्यापूर्वीच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तो प्रचंड चिंतेत आणि अस्वस्थ असल्याचे दिसून आला. त्याने त्याच्या पोटातून ड्रग्ज आणल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला दुसर्या दिवशी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाच्या आदेशावरुन त्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.
10 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत त्याच्या पोटातून काही कॅप्सुल काढण्यात आले. या कॅप्सुलमधून या अधिकार्यांनी 785 ग्रॅम वजनाचा कोकेनचा साठा जप्त केला. त्याची किंमत 7 कोटी 85 लाख रुपये इतकी आहे. कोकेनचा साठा जप्त करुन सीमा शुल्क विभागाने विदेशी नागरिकाविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला ते कोकेन कोणी दिले, कोकेन तो कोणाला देणार होता, त्याने यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का याचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.