मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – माहीम येथून माझगावला घरी जाताना भरवेगात जाणार्या एका एसटी बसची बाईकला धडक लागून झालेल्या अपघातात मोहम्मद इशाक अकबर शेख या 20 वर्षांच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा 23 वर्षांचा मित्र अरबाज मोहम्मद फिरोज अन्सारी हा गंभीररीत्या जखमी झाला. अरबाजवर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते. अपघातानंतर एसटी चालक पळून गेला असून त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात रविवारी रात्री दोन वाजता दादर येथील डॉ. बी ए रोड, हिंदमाता ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवर झाला. अकबर मंसुरअली शेख हे त्यांच्या कुटुंबियांसोबत माझगाव येथे राहत असून सुरक्षाारक्षक म्हणून कामाला आहेत. मृत मोहम्मद इशाक हा त्यांचा मुलगा असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. बेरोजगार असलेला मोहम्मद इशाक हा माझगावच्या डॉकयार्ड येथे नोकरीसाठी प्रयत्न करत होता. शनिवारी रात्री अकरा वाजता तो त्याचा मित्र अरबाजसोबत माहीम येथे गेला होता. त्यांच्या पत्नीने त्याला कॉल केल्यानंतर तो काही वेळानंतर घरी येत असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही, त्यामुळे सव्वादोन वाजता त्यांनी त्याला कॉल केला. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्या मुलाचा अपघात झाला असून त्याच्यासह त्याच्या मित्राला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
या माहितीनंतर ते त्यांच्या पत्नीसोत केईएम हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा मोहम्मद इशाक याचा मृत्यू झाल्याचे तर त्याचा जखमी मित्र अरबाज याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजले. अपघाताची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात अरबाज हा माझगाव येथे राहत असून तो त्याच्या बाईकवरुन मोहम्मद इशाकला घेऊन माहीमला गेला होता. रात्री उशिरा बाईकवरुन घरी जात असताना हिंदमाता ब्रिजच्या दक्षिण वाहिनीवरुन जाताना भरवेगात जाणार्या एका एसटी बसने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली.
या अपघातात ते दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे मोहम्मद इशाकला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले तर अरबाज हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. अपघाताच्या वेळेस अरबाज हा बाईक चालवत होता तर मोहम्मद इशाक त्याच्या मागे बसला होता. अपघातानंतर एसटी चालक घटनास्थळाहून पळून गेला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी हलगर्जीपणाने एसटी चालवून एका तरुणाच्या मृत्यूस तर दुसर्या गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या एसटी चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.