मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – क्षुल्लक कारणावरुन मानसिक शोषण करणार्या बाबू मेहतर या 55 वर्षांच्या भिक्षेकर्याची त्याच्याच सहकार्याने लाकडी बांबूने बेदम मारहाण करुन हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी सहकार्याला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. मुन्ना कृष्णचंद गुप्ता असे या 55 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी 13 एप्रिलला रात्री दहा वाजता विलेपार्ले येथील जुहू सेंट जोसेफ चर्चजवळील फुटपाथवर घडली. बाबू आणि मुन्ना हे दोघेही भिक्षेकरी असून गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या परिचित आहेत. दिवसभर भीक मागून ते दोघेही रात्री फुटपाथवर झोपत होते. मृत बाबू हा मुन्ना गुप्ताला नेहमी त्रास देत होता. त्याला शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्याचा त्याच्या मनात प्रचंड राग होता. रविवारी रात्री दहा वाजता क्षुल्लक कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.
यावेळी रागाच्या भरात मुन्नाने बाबूवर लाकडाने प्राणघातक हल्ला केला होता. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बाबू हा जागीच कोसळला होता. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या बाबूला पोलिसांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस हवालदार नरेंद्र नामदेव तेली यांच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी मुन्ना गुप्ताविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मुन्ना गुप्ता हा विलेपार्ले येथील एन. एस रोड, सारस्वत बँकेसमोरील फुटपाथवर राहत असून सध्या भिक मागून स्वतचा उदरनिर्वाह चालवत होता. बाबू हा त्याचा मित्र असून ते दोघेही एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले.