6 कोटी 63 लाख 16 हजाराचा मुद्देमाल 491 तक्रारदारांना परत
परिमंडळ दहातंर्गत स्थानिक पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एपिल 2025
मुंंबई, – चोरीसह गहाळ झालेले मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्याची मोहीम सध्या मुंबई पोलिसांनी सुरु केली आहे. परिमंडळ दहातंर्गत स्थानिक पोलिसांनी अलीकडेच एका विशेष कार्यक्रमांत 6 कोटी 63 लाख 16 हजार 200 रुपयांचा चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल 491 तक्रारदारांना परत केला होता. कुठलीही शाश्वती नसताना हा मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी संबंधित पोलिसांचे विशेष आभार व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक तक्रारदारांनी त्यांच्या मुद्देमालाच्या चोरीसह गहाळ झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन आरोपींना अटक करुन चोरीसह गहाळ झालेला मुद्देमाल जप्त केला होता. हा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यासाठी अलीकडेच परिमंडळ दहातंर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, सेव्हन हिल हॉस्पिटल, ऑडीटोरीअम हॉलमध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यात सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दाहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ दहाचे सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याच कार्यक्रमांत 491 तक्रारदारांना त्यांचे चोरीसह गहाळ झालेले 6 कोटी 63 लाख 16 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. त्यात 66 तक्रारदारांना 1 कोटी 38 लाख 64 हजार रुपयांचे 1 किलो 908 ग्रॅम वजनाचे गोल्ड दागिने, पंधरा तक्रारदारांना 1 कोटी 50 लाख 66 हजार 700 रुपयांची कॅश देण्यात आली. इतर मुद्देमालांमध्ये 15 लाख 55 हजार रुपयांचे 27 दुचाकी, 9 लाख 35 हजार रुपयांचे दहा तीनचाकी, 2 कोटी 11 हजार रुपयांचे चौदा चारचाकी वाहने, 1 कोटी 33 लाख 23 हजार 500 रुपयांचे 347 मोबाईल, 4 लाख 72 हजार रुपयांचे लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूचा समावेश आहे.
चोरीसह गहाळ झालेले मुद्देमाल पुन्हा मिळेल असे वाटत नसताना पोलिसांनी त्यांचा मुद्देमाल परत मिळवून दिला होता. त्यामुळे अनेकांनी पोलिसांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. स्कॉटलंड पोलिसांपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मुंबई पोलीस कर्तव्य बजावत आहे असे मनोगत व्यक्त करुन पोलिसांचे आभार व्यक्त केले. तसेच सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचे मनोबल वाढविले होते. हा कार्यक्रम अंत्यत आनंदाच्या वातावरणात पार पडला, तक्रारदारांना त्यांचा मुद्देमाल परत मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होता असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांनी सांगितले.