गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाला 40 लाखांना गंडा
एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – गुंतवणुकीच्या बहाण्याने एका 59 वर्षांच्या व्यावसायिकाची एकाच कुटुंबातील तिघांनी सुमारे 40 लाखांची फसवणुक केली. याप्रकणी जयकिशन मुरलीधर सप्रा, किरण सप्रा आणि मुरलीधर सप्रा या तिघांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. या तिघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स पाठविले जाणार आहे. गुंतवणुकीच्या नावाने या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
महेंद्र कन्हैयालाल हेमदेव हे चर्चगेट येथील अग्रवाल हाऊसमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते गुंतवणुक सल्लागार म्हणून काम करत असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. सप्रा कुटुंबिय त्यांच्या परिचित असून अठरा वर्षांपूर्वी जयकिशन हे त्यांच्या राहत्या घरी आले होते. त्याचा स्वतचा व्यवसाय असून व्यवसाय वाढीसाठी त्याला पैशांची गरज आहे. त्यामुळे त्याच्या व्यवसायासाठी त्यांनी गुंतवणुक करावी अशी विनंती केली. तसेच त्यांनी चीन देशात व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना भविष्यात चांगला फायदा होईल असे सांगून त्यांचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच्या आमिषाला बळी पडून महेंद्र हेमदेव यांनी जानेवारी 2007 ते जून 2008 या कालावधीत त्याच्याकडे चाळीस लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र सतरा वर्ष उलटूनही त्याने त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिटची रक्कम दिली नाही. गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. याकामी जयकिशनला करण सप्रा आणि मुरलीधर सप्रा यांनी मदत केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सप्रा कुटुंबियांविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जयकिशन, किरण मुरलीधर सप्रा या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.