मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – ईस्टर्न फ्रिवेवरील अपघातात एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये विनोद रामा वायडे आणि अनिता रामजी जैस्वार यांचा समावेश असून त्यांचा मृतदेह जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. अपघातात इतर चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. खुशबू रामनयन राजभर, तिची आई गीता रामनयन राजभर, नातेवाईक सुलेखा वायडे आणि चेतन चंदू पाटील अशी या चौघांची नावे आहेत. यातील चेतन पाटील हा कारचालक असून त्याच्याविरुद्ध भान्याससह वाहतूक पोलीस कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात सोमवारी 14 एप्रिलला शिवडीच्या ईस्टर्न फ्री वेच्या ऑरेज गेटजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खुशबू ही कळवा येथील रहिवाशी असून व्यवसायाने शिक्षिका आहेत. सोमवारी पहाटे ती तिच्या आई आणि इतर तिघांसोबत भाऊचा धक्का येथे मासे आणण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा कारचालक चेतन पाटील होता. पहाटे चार वाजता ते सर्वजण कळवा येथील वाघोबानगर येथील त्यांच्या घरातून निघाले होते. पहाटे रस्ता खाली असल्याने चेतनने भरवेगात कार पळविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खुशबूने त्याला कार सावकाश चालविण्याचा सल्ला दिला होता, त्याकडे त्याने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते.
ही कार ईस्टर्न फ्री वेच्या ऑरेंज गेटजवळ येताच चेतनचा कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याने भरवेगात कारची डिवायडरला जोरात धडक दिली. त्यात कारचे प्रचंड नुकसान झाले होते. अपघातात कारधील सहाजण गंभीररीत्या जखमी झाले होते. ही माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच शिवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी सहाजणांना तातडीने जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्तया आले होते. तिथे विनोद वायडे आणि अनिता जैस्वार या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते तर इतर चौघांवर उपचार सुरु केले होते.
याप्रकरणी खुशबूची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक चेतन पाटील याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून दोघांच्या मृत्यूस तर स्वतसह इतर तिघांना गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अपघातात तो जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.