क्रेडिटवर घेतलेल्या २६ कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक
चार व्यापार्यांना गंडा घालणार्या हिरे व्यापार्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे २६ कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याने त्याचा चार हिरे व्यापारी मित्रांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे येथील बीकेसी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शालिन नितीनकुमार शाह या हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह अपहाराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच शालिन हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी बीकेसी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फसवणुक झालेल्या व्यापार्यांनी बीकेसी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हरेश सामजीभाई कासोदरिया हे जोगेश्वरी येथे राहत असून वांद्रे येथील बीकेसी लक्ष्मी टॉवरमध्ये असलेल्या डीडीपीएल या डायमंड कंपनीत २५ वर्षांपासून कामाला आहेत. शालिन हे हिरे व्यापारी असल्याने व्यवसायानिमित्त त्यांची ओळख झाली होती. गेल्या सात वर्षांपासून ते शालिनच्या परिचित होते. त्याची किशा एक्सपोर्ट नावाची कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून शालिन हा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. अनेकदा त्याने त्यांच्याकडून विक्रीसाठी क्रेडिटवर हिरे घेतले होते. दिलेल्या मुदतीत हिर्यांचे पेमेंट आणि हिरे परत करुन त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. २० मार्च २०२३ रोजी शालिन हा त्यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे एक हिरे व्यापारी असून त्याला प्रिन्सेस कट फॅन्सी हिर्यांची गरज असल्याचे सांगून त्याने त्यांच्याकडून आधी बारा कोटी चौदा लाख रुपयांचे हिरे घेतले होते. या व्यवहारात त्यांना चांगला नफा मिळेल असे सांगून त्याने १०५ दिवसांत पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन महिने उलटूनही त्याने हिरे किंवा हिर्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट जमा केले नाही. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आणखीन दोन महिन्यांची मुदत मागून घेतली होती.
काही महिन्यानंतर त्याने त्यांना पुन्हा फोन करुन त्यांच्याकडे आणखीन काही हिर्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला सप्टेंबर २०२३ रोजी सुमारे नऊ कोटीचे तर जानेवारी २०२४ रोजी २७ लाख रुपयांचे हिरे दिले होते. या तिन्ही व्यवहाराचे पेमेंट एकत्र करु असे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे किंवा हिर्यांचे पेमेंट केले नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे २१ कोटी ५३ लाख रुपयांचा हिर्यांचा अपहार करुन त्याने त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शालिन शाहविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदविला होता.
अन्य एका गुन्ह्यांत शालिनने बीकेसीच्या भारत डायमंड बोर्सच्या तीन व्यापार्याची सुमारे साडेचार कोटीच्या अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निरव अरविंदभाई पारिख हे हिरे व्यापारी असून त्यांची अनेरी ज्वेल्स डायमंड नावाची एक कंपनी बीकेसीच्या भारत डायमंड बोर्स येथे आहे. शालिन हादेखील हिरे व्यापारी असून त्याची किशा एक्सपोर्ट नावाची कंपनी आहे. गेल्या चार वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्यांचा व्यवहार केला होता. त्यामुळे त्याच्यावर त्यांचा विश्वास होता. २४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२४ या कालावधीत शालिनने त्यांच्यासह जोधानी ब्रदर्स डायमंड कंपनीचे जयसुख नकुभाई जोधानी आणि लक्ष्मी डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे मालक शैलेश रतीभाई गजरा यांच्याकडून साडेचार कोटी रुपयांचे हिरे विक्रीसाठी घेतले होते. मात्र दिलेल्या हिर्यांचे पेमेंट किंवा हिरे परत न करता हिर्यांचा अपहार करुन तीन व्यापार्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात शालिनविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून पळून गेलेल्या शालिन शाहचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.