मरिनलाईन्स-गोवंडी येथे दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला
अल्पवयीन मुलासह दोघांना अटक तर तिघांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई,- नेपाळी म्हणून चिडवल्याने तसेच जुन्या वादातून दोघांवर त्यांच्याच परिचित आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मरिनलाईन्स आणि गोवंडी परिसरात घडली. या हल्ल्यात दोन्ही तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर जी. टी आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी आझाद मैदान आणि शिवाजीनगर पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. याच गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलासह दोघांना पोलिसांनी अटक केली तर इतर तीनजण फरार आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिली घटना रविवारी पावणेदहा वाजता मरिनलाईन्स येथील व्ही. टी मार्ग, वेस्टएंड हॉटेलसमोरील कामा हॉस्पिटल गेट क्रमांक तीनजवळ घडली. चर्चगेट रेल्वे स्थानकातील फुटपाथवर राहणार टोकेट्रो विसाटो अयेमी हा बिगारी कामगार आहे. रविवारी तो त्याच्या काही मित्रासोंबत मुंबई दर्गावरुन जेवण घेऊन चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. कामा हॉस्पिटल गेट क्रमांक तीनजवळ येताच त्याचा परिचित सोनूकुमार सिंगने त्याला पाहून नेपाळी नेपाळी अशी हाक मारुन चिडविण्याचा प्रयत्न केला.
याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला आणि त्याने सोनूकुमारला कानशिलात लगावली. त्याचा राग आल्याने सोनूकुमारसह त्याचा मित्र ब्रम्हानंद यांनी त्याला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. काही वेळानंतर सोनूकुमारने त्याच्या खिशातून चाकू काढून त्याच्या गळ्यावर जोरात वार केला होता. त्यात टिकेट्रो हा जखमी झाल्याने त्याला जी. टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी टोकेट्रो अयेमी याच्या जबानीवरुन दोन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सोमवारी सोनूकुमार सिंग आणि ब्रम्हानंद श्रीभगवान त्रिपाठी या दोन्ही भिक्षेकर्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर मंगळवारी दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोवंडीतील अन्य एका घटनेत जाहिद जमाल खान या 26 वर्षांच्या तरुणावर चौघांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या जाहिदवर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी एका सतरा वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात आमीर शेख, जाकीर काटासह अन्य एका आरोपीचा समावेश आहे. पूर्ववैमस्नातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमी आणि आरोपी एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहे. जुन्या वादातून शनिवारी जाहिदवर या चारही आरोपीने चाकूने हल्ला केला होता. यात त्याच्या पोटाला, पाठीला, गालाला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले तर इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.