एमबीबीएससाठी मेडीकलमध्ये प्रवेश देतो सांगून फसवणुक

1.13 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – एमबीबीएससाठी नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून एका व्यावसायिक महिलेची 1 कोटी 13 लाख रुपयांची फसवणुक झाल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध पवई पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. करण दिलीप बोथारा आणि सौम्या करण बोथारा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पुण्याचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार आहे.

42 वर्षांची हेमलता जगदीश जोशी या भारतातील विदेशी नागरिक असून त्या गेल्या वीस वर्षांपासून दुबई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा दुबईमध्ये परफ्युमचा व्यवसाय आहे. तिच्या मालकीचा पवईतील न्यू हिरानंदानी स्कूलजवळील रिचमॉर्ड टॉवरमध्ये एक फ्लॅट आहे. अनेकदा भारतात आल्यानंतर त्या त्यांच्या कुटुंबियासोबत तिथेच राहतात. पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने मोहित धाकन या व्यक्तीशी दुसरे लग्न केले होते. तिला रुही नावाची एक मुलगी असून सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे. 2022 साली तिने बारावीची परिक्षा दिली होती. 2019 साली त्यांची करण व सौम्याशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते चांगले मित्र झाले होते. त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. तिच्या मुलीला बारावीनंतर मेडीकलमध्ये प्रवेश घ्यायचा होता. याबाबत तिने करणला सांगितले होते.

करणने तिला त्याची मुंबईसह पुण्यातील काही नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये ओळख असल्याचे सांगून तिला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो. मात्र मेडीकल प्रवेशासाठी किमान सव्वातीन कोटी खर्च अपेक्षित असून किमान एक कोटी तेरा लाख रुपये तिला आधी द्यावे लागतील. उर्वरित पैसे प्रवेश मिळाल्यानंतर तिने टप्याटप्याने भरावे असे त्याने तिला सांगितले. करण व सौम्या यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्याने तिने त्यांना 29 मार्च 2024 रोजी एक कोटी तेरा लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. यावेळी तिथे तिच्यासोबत तिचे पती मोहित, मुलगी रुही आणि सहाय्यक कर्मचारी हेमेंद्र शहा आदी उपस्थित होते. यावेळी करणने तिला मेडीकलमध्ये नक्की प्रवेश देतो असे सांगून प्रवेश मिळवून दिला नाहीतर तिला एक कोटी तेरा लाखांचा एक धनादेश दिला होता.

मात्र दिलेल्या मुदतीत त्याने तिच्या मुलीला मेडीकलमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. करणकडून काम होत नसल्याने तिने त्याच्याकडे मेडीकल प्रवेशासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र नंतर त्याने तिने फोन घेणे बंद केले होते. त्यामुळे तिने करणने दिलेला धनादेश बँकेत जमा केला होता. मात्र हा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. या घटनेनंतर ती तिचे वडिल जगदीश जोशी, वकिल श्रुती चर्तुवेदी, बहिण मिनाक्षी जोशी यांच्यासोबत करणला भेटण्यासाठी पवईतील हॉटेल बिटलमध्ये गेली होती. यावेळी करणने सर्वासमोर तिच्याकडून मेडीकल प्रवेशासाठी एक कोटी तेरा लाख रुपये घेतल्याचे मान्य करुन तिला काही दिवसांत ही रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र त्याने दिलेला दुसरा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. याबाबत विचारणा करण्यासाठी तिने त्याला कॉल केला असता त्याने पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर. आता बघ तुझी कशी बदनामी करतो, तुला बर्बाद करतो अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने सप्टेंबर 2024 रोजी करण आणि सौम्याकडून झालेल्या फसवणुकीबाबत पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी पवई पोलिसांची एक टिम लवकरच पुण्याला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page