दहा हजाराच्या लाचप्रकरणी मनपाच्या भाडे पर्यवेक्षक दोषी

तीन वर्षांच्या कारावासासह 25 हजाराच्या दंडाची शिक्षा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – दहा हजार रुपयांच्या लाचप्रकरणी कारवाई करण्यात आलेले महानगरपालिकेचे भाडे पर्यवेक्षक लक्ष्मण धानू पवार याला लाचप्रकरणी विशेष सेशन कोर्टाने दोषी ठरविले. याच गुन्ह्यांत त्याला तीन वर्षाच्या कारावासासह 25 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मनपाची खोली हस्तांतरीत करण्यासाठी लक्ष्मण पवार यांनी ही लाचेची मागणी केली होती.

यातील तक्रारदार शीव-कोळीवाडा, सरदार नगर दोन, रावळी कॅम्प परिसरात राहतात. 2001 साली त्यांच्या आईने महानगरपालिकेच्या जागेवर असलेली ही रुम समजुतीच्या करारावर विकत घेतली होती. ही रुम तक्रारदारांच्या नावे हस्तांतरीत करण्यासाठी त्यांनी एप्रिल 2015 साली महानगरपालिकेच्या एफ/उत्तर विभाग, मालमत्ता कक्षेत रितसर अर्ज केला होता. मात्र या अर्जावर काहीच सुनावणी होत नव्हती. त्यामुळे त्यांनी भाडे पर्यवेक्षक लक्ष्मण पवार यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी लक्ष्मण पवार यांनी ही रुम हस्तांतरीत करण्यासाठी त्यांच्याकडे वीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.

ही लाच दिल्याशिवाय रुम हस्तांतरीत होणार नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांनी वीस हजार रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लक्ष्मण पवार यांच्याविरुद्ध या अधिकार्‍यांनी लाचेची मागणी केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता. 18 एप्रिल 2016 रोजी ठरल्याप्रमाणे तक्रारदार दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी पवार त्यांना घेऊन माटुंगा येथील भाऊ दाजी रोडवर आले होते. तिथेच दहा हजार रुपयांची लाचेची रक्कम घेताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले.

याच गुन्ह्यांत नंतर त्याला अटक करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची नियमित सुनावणी कोर्टात सुरु होती. अलीकडेच या खटल्याची पूर्ण झाली. यावेळी लक्ष्मण पवार याच्याविरुद्ध आरोप सबळ पुराव्यानिशी सिद्ध झाले होते. त्यामुळे त्याला लाचप्रकरणी दोषी ठरवून कोर्टाने तीन वर्षांचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, दिपक बर्गे, अविनाश कवठेकर यांनी केला तर सरकारी वकिल म्हणून प्रभाकर तरंगे यांनी काम पाहिल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मनिषा झेंडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page