43 लाखांच्या सोन्याचा अपहार करुन दोन व्यापार्यांची फसवणुक
ज्वेलर्स मालकासह नोकराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – सुमारे 43 लाख रुपयांच्या ज्वेलर्स दागिन्यांचा अपहार करुन दोन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवीतील विठ्ठलवाडी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका ज्वेलर्स मालकासह नोकराविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. हस्तीमल परमार आणि कल्पेश पोपटलाल जैन अशी या दोघांची नावे असून पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील सुमेंद्र सुजीत सांमता हे सोने कारागीर असून ते मांडवीच्या सॅम्युअल स्ट्रिट परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी येथील विठ्ठलवाडी, गोपाळदास लक्ष्मीदास इमारतीमध्ये सोने बनविण्याचा कारखाना आहे. हस्तीमल परमार हा त्यांचा परिचित ज्वेलर्स व्यापारी आहे. त्याचा अरबुदा ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्याने सुमेंद्र सांमता यांच्याकडून 348 ग्रॅम वजनाचे 27 लाखांचे विविध सोन्याचे नेकलेस घेतले होते. या नेकलेसच्या बदल्यात त्यांना शुद्ध सोने देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना शुद्ध सोने किंवा दागिन्यांचे पेमेंट न देता त्यांनी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केला होता. या घटनेनंतर सुमेंद्र सांमता यांनी हस्तीमल परमार याच्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार कमलेश पोपटलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. ते भायखळा येथे राहत असून त्यांचा विठ्ठलवाडी परिसरात राजेंद्र ज्वेलर्स नावाचे एक शॉप आहे. त्यांच्याकडे कल्पेश जैन हा कामाला होता. गेल्या वर्षी त्याने त्यांच्या शॉपमधून ओरिया येथील बंजेनगर, कमला ज्वेलर्सच्या मालकाला देण्यासाठी साडेपंधरा लाखांचे 201 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेतले होते. मात्र या दागिन्यांची विक्री न करता त्याने दागिन्यांचा परस्पर अपहार केला. दागिने परत न करता किंवा दागिन्यांचे पेमेंट न करता मालक कमलेश जैन यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी कल्पेश जैन याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी हस्तीमल परमार आणि कल्पेश जैन यांच्याविरुद्ध दागिन्यांचा अपहार करुन ज्वेलर्स मालकांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.