बोगस दस्तावेजाच्या मदतीने क्रेडिट कार्ड मिळवून फसवणुक
नामांकित बँकेसह अर्थ पुरवठा करणार्या कंपनीला गंडा घातला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – बोगस दस्तावेजाच्या मदतीने एका नामांकित बँकेचे क्रेडिट कार्ड मिळवून ऑनलाईन शॉपिंगसह विविध बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करुन सुमारे सव्वाकोटीची फसवणुक करणार्या आसामच्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित पाच आरोपींना आसाम येथून गुन्हे शाखेने अटक केली आहे. मोहेबूर अब्दुल रेहमान, अझरुल सादिकुल इस्लाम, इलियास रफिकुल इस्लाम, अबूबकर सिद्धीक रमजान अली आणि मोहीमुद्दीन अहमद अब्दुल मलिक अशी या पाचजणांची नावे आहेत. या टोळीने विविध बँकेसह अर्थपुरवठा करणार्या खाजगी कंपनीत बोगस दस्तावेज सादर करुन कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि क्रेडिट घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या वर्षी आझाद मैदान पोलीस ठाण्यात बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या तक्रारीत 55 जणांचे बोगस पॅनकार्ड आणि आधारकार्ड बनवून या कागदपत्रांच्या आधारे एका नामांकित बँकेत क्रेडिट कार्डसाठी अर्ज करण्यात आला होता. क्रेडिट कार्ड प्राप्त करुन संबंधित आरोपींनी बँकेची 1 कोटी 26 लाख 98 हजार 327 रुपयांची फसवणुक केली होती. हा प्रकार बँकेच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या निदर्शनास येताच बँकेच्या वतीने उपाध्याक्ष नयन चंद्रकांत भगदेव यांनी आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संंबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल चंद्रमोरे यांनी गंभीर दखल घेत या गुन्ह्यांचा संमातर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानंतर युनिट तीनचे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, प्रशांत गावडे, पोलीस हवालदार आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, युवराज देशमुख यांनी तपास सुरु केला होता. तपासात संबंधित आरोपींनी काही लोकांना संपर्क साधून त्यांचा सिबील स्कोअर चांगला आहे असे सांगून त्यांच्याकडून त्यांचा डेटा प्राप्त केला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावाने बोगस आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविले होते. याकामी आरोपींनी स्वतचे अस्तित्व आि ओळख लपविण्यासाठी योग्य ती काळजी घेतली होती. त्यानंतर त्यांनी बँकेत क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. बँकेतून क्रेडिट कार्ड प्राप्त होताच त्याचा विविध ऑनलाईन शॉपिगसाठी वापर करण्यात आला होता. काही रक्कम इतर बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती.
अशा प्रकारे या आरोपींनी काही दिवसांत बँकेला सुमारे सव्वाकोटींना गंडा घातला होता. आरोपींनी वापर केलेल्या बँक खात्यासह स्टेटमेंट, के्रडिट कार्डचा वापर केलेली ठिकाणे, गुन्हा करताना वापर करताना मोबाईलचा क्रमांक आदींचा तांत्रिक माहिती काढण्यात आली होती. त्यात ही टोळी आसाम राज्यात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या पथकाने आसाम येथून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गुन्हे शाखेने मोरीगावच्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने मोहेबूर रहमान, अझरुल इस्लाम, इलियास इस्लाम, अबूबकर अली आणि मोहीमुद्दीन मलिक अशा पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या पाचही आरोपींना अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. पाचही आरोपी आसामच्या मोरगावख्या अमरागुरी, लालीपथ्थर, हत्यारबोरी, कारीमरीचे रहिवाशी आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांचे बोगस आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर बोगस दस्तावेज बनविले असून या दस्तावेजाच्या आधारे आदित्य बिर्ला फायनान्स, अॅक्सिस बँक, एल. टी फायनान्स कंपन्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे कर्ज आणि क्रेडिट घेऊन फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्यांचे इतर काही सहकारी असून त्यांनीच संगनमत करुन ही संपूर्ण आर्थिक घोटाळा केला आहे. त्यामुळे इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.