मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून अस्लम शमशुद्दीन काझी या वयोवृद्ध सासर्याला माळ्यावरुन सायकल काढण्यास सांगून शिडीवरुन जोरात धक्का देऊन जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपी सूनेला मालवणी पोलिसांनी अटक केली. फरजाना अशफाक काझी ऊर्फ फरजाना युसूफ शेख असे या 29 वर्षांच्या आरोपी सूनेचे नाव असून याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
64 वर्षांचे अस्लम काझी हे मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून चालक म्हणून काम करतात. त्यांचा अशफाक नावाचा एक मुलगा असून त्याची फरजाना ही पत्नी आहे. अशफाक हा कॉल सेंटरमध्ये कामाला असून फरजाना ही गृहिणी आहे. 16 फेब्रुवारीला दुपारी दिड वाजता नमान पठन करुन ते घरी आले आणि आराम करत होते. काही वेळानंतर फरजानाने त्यांना मुलीला खेळण्यासाठी सायकल काढून देण्यास सांगितले. त्यामुळे ते सायकल काढण्यासाठी चौथ्या माळ्यावर गेले होते.
शिडीवरुन सायकल काढत असताना अचानक फरजानाने त्यांना जोरात धक्का दिला होता. यावेळी त्यांनी फरजानाला काय करतेस अशी विचारणा केली होती, मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले. जिवे मारण्याच्या उद्देशानेच फरजानाने त्यांना चौथ्या मजल्यावरुन पत्र्यावरुन धक्का दिला होता. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने रक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नंतर परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी त्यांची मुलगी गझाला शकील शेख हिने पोलिसांना अस्लम काझी ही शिडीवरुन पडल्याने हा अपघात असून तिची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे तिच्या जबानीत म्हटले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची मुलगी गझाला आणि पत्नी फातिमा अस्लम काझी यांनी त्यांची सून फरजानाविरुद्ध तर फरजानाने या दोघीविरुद्ध मालवणी पोलिसांत अदखलपात्र तक्रार केली होती. हा प्रकार नंतर त्यांना समजले होते. शुद्धीवर येताच त्यांनी घडलेला प्रकार त्यांचा मुलगा अशफाकला सांगितला.
यावेळी त्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अस्लम काझी यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार त्यांची सून फरजाना हिने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या जबानीनंतर मालवणी पोलिसांनी फरजानाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत अलीकडे फरजानाला पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वादातून तिने अस्लम काझी यांच्यावर जिवघेणा हल्ला केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.