3.10 कोटीचे कर्ज घेऊन फसवणुकप्रकरणी साक्षीदाराला अटक
पत्नीनेच इतर आरोपींच्या मदतीने पतीची फसवणुक केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – पत्नीनेच संयुक्त नावावर असलेल्या घराचे बोगस पॉवर ऑफ अॅटनीसह इतर बोगस शासकीय कागदपत्रे तयार करुन बँकेतून तीन कोटी दहा लाखांचे कर्ज घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस चारकोप पोलिसांनी अटक केली. उमेश लक्ष्मण मंडल असे या आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर एक वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत श्वेता शाम कबाडकर, दर्शन भरतभाई चुडगर, करण दिलीप ढाबलिया, विशाल शिवाभाई परमार, बिना जयंतीलाल रुपारेलिया असे पाचजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोरोना काळात गारर्मेट व्यवसायात आलेले नुकसान आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी श्वेतानेच इतर आरोपींच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 52 वर्षांचे शाम रत्नाकर कबाडकर हे कांदिवलीतील चारकोपचे रहिवाशी असून ते दुबईतील ओएनजीसी शेल्फड्रिलिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीचे पवई येथे एक कार्यालय असून तिथेच सध्या त्यांची नियुक्ती आहे. त्यांच्या मालकीचे चारकोप, सेक्टर आठ, हिल्स व्हयू, चारकोप दिपमध्ये दोन फ्लॅट आहे. ते दोन्ही फ्लॅट त्यांच्यासह त्यांची पत्नी श्वेता हिच्या संयुक्त नावावर आहेत. श्वेताचे मालाड येथे गारमेंटचा व्यवसाय होता, मात्र कोरोना काळात तिला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तिने तिची कंपनी बंद केली होती.
20 नोव्हेंबर 2023 रोजी ते घरी होते. त्यांचा पासपोर्ट शोधत असताना त्यांना त्यांच्या फ्लॅटचे काही कागदपत्रे सापडले होते. त्यात पॉवर ऑफ अॅटनीसह फ्लॅटचे इतर शासकीय दस्तावेज होते. त्यात त्यांच्या पत्नी श्वेताने त्यांच्या संयुक्त नावावर असलेले दोन्ही फ्लॅट तिच्या नावावर केले होते. त्यात त्यांचे फोटो, आधारकार्ड, पॅनकार्डसह इतर दस्तावेज जोडले होते. या दोन्ही फ्लॅटचे तिने गोरेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात रितसर नोंदणी केली होती. यावेळी नोंदणी करताना तिने त्यांच्याऐवजी दुसर्या व्यक्तीचा फोटो लावला होता. या पॉवर ऑफ अॅटनीच्या कागदपत्रावर करण धाबलिया आणि उमेश मंडल यांनी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली होती.
याबाबत त्यांनी तिच्या पत्नीकडे विचारणा केली असता तिने कोरोना काळात तिला गारमेंट व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यात तिने मालवणीतील राम रहिमकडून व्याजाचे पैसे घेतले होते. त्या पैशांच्या वसुलीसाठी तिला दिलीप, विशाल, उमेश बिना हे चौघेही त्रास देत होते. तिच्यासह त्यांच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी देत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी बिनानेच तिला त्यांच्या संयुक्त नावावर असलेल्या फ्लॅटवर कर्ज करण्याची योजना सांगितली होती. त्यामुळे तिने इतर आरोपींच्या मदतीने फ्लॅटचे बोगस दस्तावेजासह पॉवर ऑफ अॅटनी बनवून त्याची गोरेगाव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी केली होती.
इतकेच नव्हे तर त्यांनी सोसायटीच्या बोगस लेटरहेडवर सोसायटीच्या अध्यक्ष, सेक्रेटरीचे एनओसी बनवून एका खाजगी बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता. कर्जासाठी तिने दर्शनसोबत एक बोगस कंपनी सुरु करुन कंपनीच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम ट्रान्स्फर करण्याची विनंती केली होती. या कागदपत्रावरुन तिला बँकेने तीन कोटी दहा लाखांचे ओडी लोन मंजूर केले होते. त्यापैकी एक कोटीचे कर्ज तिच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यापैकी पाच लाख रुपये तिने विशालला तर उर्वरित ऐंशी लाख रुपये इतर आरोपींच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. अशा प्रकारे दर्शन, करण, विशाल, बिना आणि उमेश यांनी त्यांची पत्नी श्वेता हिला फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनविण्यास मदत करुन तिला बँकेतून तीन कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज काढण्यास प्रवृत्त केले.
या पाचजणांनी त्यांच्या पत्नीच्या मदतीने हा संपूर्ण घोटाळा करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगून संंबंधित सहाही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शहानिशा केली होती. त्यात या आरोपींनी कट रचून बोगस दस्तावेज बनवून ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे शाम कबाडकर यांची पत्नी श्वेता कबाडकर हिच्यासह दर्शन चुडगर, करण ढाबलिया, विशाल परमार, बिना रुपारेलिया आणि उमेश मंडल यांच्याविरुद्ध पोलिसांनी 120 बी, 420, 465, 467, 468, 471, 34 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत साक्षीदार असलेला उमेश मंडल हा गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला तीन दिवसांपूर्वी चारकोप पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.