37 वर्षांपासून फरार असलेल्या दाऊदच्या सहकार्याला अटक
हत्येच्या प्रयत्नाच्या खटल्याच्या सुनावणी गैरहजर राहत होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – गेल्या 37 वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळचा खास सहकारी मंगेश गोविंद मोरे ऊर्फ मंगेश मांजरेकर याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. 1988 साली झालेल्या एका हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीला तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अटकपूर्व जामिन वॉरंट जारी केले होते. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले.
हरेश कमलदास केशवाणी हे उल्हासनगरचे रहिवाशी आहेत. ते अग्रीसेनेचे अध्यक्ष गोपाळ रजवानी यांच्याकडे चालक म्हणून कामाला होते. 28 नोव्हेंबर 1988 साली ते गोपाळ रजवानीसोबत त्यांच्या कारमधून युनिव्हरसिटी, ग्रिनलेन्स बँकेसमोरुन जात होते. यावेळी मंगेश मोरे याने त्याच्याकडील पिस्तूलमधून गोपाळ रजवानी यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या गोळीबारात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी कट रचून हत्येचा प्रयत्नासह घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होात.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान तो सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. तसेच त्याच्या अटकेचे आझाद मैदान पोलिसांना दिले होते. गेल्या 37 वर्षांपासून मंगेश हा फरार होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. मात्र प्रत्येक वेळेस तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो स्वतचे अस्तिस्व आणि नाव बदलून वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होता. मंगेश हा जास्त दिवस एकाच ठिकाणी राहत नव्हता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता.
ही शोधमोहीम सुर असताना मंगेश हा रायगड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक दळवी, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद चंदवाडे, सहाय्यक फौजदार संदीप लोखंडे, पोलीस शिपाई कांबळे, बोरसे, पाटील, महिला शिपाई झुंजरे आदीचे एक पथक रायगड येथे पाठविण्यात आले होते.
तिथे मंगेशचा शोध सुरु असताना तो रायगडच्या महाड, ब्रदुक या ठिकाणाहून 15 किलोमीटर आत मोठ्या डोंगराळ भागात लपला होता, तिथे येण्याजाण्यासाठी अडगळीचा रस्ता होता, मोबाईल नेटवर्क नव्हता. तरीही या पथकाने तिथे शोधमोहीम हाती घेऊन मंगेश मोरे याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो फरार आरोपी मंगेश असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. गेल्या 37 वर्षांपासून फरार असलेल्या मंगेश मोरेला अटक करणार्या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.