मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – पवईतील एका खाजगी कंपनीत मॅनेजर पदावर काम करणार्या 23 वर्षांच्या तरुणाला ब्लॅकमेल करुन अज्ञात तरुणीने खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोघांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने त्याच्याकडून खंडणी वसुली केली असून त्याने आणखीन पैसे द्यावेत म्हणून त्याला धमकावले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
23 वर्षांचा तक्रारदार गेल्या एक वर्षांपासून सांताक्रुज परिसरात राहतो. पवईतील एका खाजगी कंपनीत तो मॅनेजर म्हणून कामाला आहे. फेब्रुवारी महिन्यांत त्याने एका खाजगी अॅप डाऊनलोड केला होता. या अॅपवर प्रोफाईल मॅच झालेल्या तरुणीसोबत बोलत होता. तिथे त्याची दिव्या या तरुणीशी ओळख झाली होती. काही दिवसांत त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही चॅटच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. 6 एप्रिलला तो त्याच्या कार्यालयात होता. यावेळी त्याला दिव्याने कॉल केला होता. त्याने कॉल घेतला असता तिने तिच्या अंगावर काहीच कपडे घातले नव्हते.
दहा सेंकदानंतर तिने व्हिडीओ कट करुन त्याला मॅसेज करुन कपडे काढण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांचे व्हिडीओ एडीट करुन त्याने तिला पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली. पैसे दिले नाहीतर त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत तिने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. बदनामीच्या भीतीने त्याने तिला ऑनलाईन वीस हजार रुपये पाठविले.
ही रक्कम मिळाल्यानंतर तिने त्याच्याकडे आणखीन पैशांची मागणी सुरु केली होती. ती सतत त्याला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देत होती. या प्रकारानंतर त्याने घडलेला प्रकार पवई पोलिसांना सांगून दिव्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.