क्रेडिटवर घेतलेल्या 5.81 कोटीच्या अपहार करुन फसवणुक
दोन व्यापार्यांना गंडा घालणार्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – वांद्रे येथे दोन वेगवेगळ्या घटनेत क्रेडिटवर घेतलेल्या 5 कोटी 81 लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन दोन हिरे व्यापार्यांची तिघांनी फसवणुक केली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीविरुद्ध बीकेसी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखचल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. नंदकिशोर गिरजेश पांडेय, चिराग त्रिकमभाई विराडिया आणि योगेश त्रिकमभाई विराडिया अशी या तिघांची नावे आहेत. यातील नंदकिशोर भाईंदर तर विराडिया बंधू गुजरातच्या सुरतचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही हिरे व्यापार्याकडून क्रेडिटवर हिरे घेऊन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
प्रदीप जयंतीलाल शाह हे सांताक्रुज येथे राहत असून हिरे व्यापारी आहेत. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स परिसरात हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. नंदकिशोर हेदेखील हिरे व्यापारी असून त्यांच्यात व्यावसायिक संबंध आहे. अनेकदा नंदकिशोरने त्यांच्याकडून विक्रीसाठी हिरे घेतले होते. या हिर्यांचे पेमेंट दिलेल्या मुदतीत केल्यामुळे त्यांचा नंदकिशोर यांच्यावर विश्वास होता. गेल्या महिन्यांत तो प्रदीप जैन यांच्या कार्यालयात आला होता. त्याच्याकडे चांगले ग्राहक असून त्यांना काही हिर्यांची गरज आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे क्रेडिटवर काही हिर्यांची मागणी केली होती.
नंदकिशोर हा त्यांचा विश्वास हिरे व्यापारी असल्याने त्यांनी त्याला 18 मार्च ते 11 एप्रिल 2025 या कालावधीत 4 कोटी 57 लाख रुपयांचे हिरे क्रेडिटवर दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे परत केले किंवा हिर्यांचे पेमेंट केले नव्हते. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी नंदकिशोर पांडेयविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत दोन हिरे व्यापारी बंधूंनी एका हिरे व्यापार्याची सुमारे सव्वाकोटीच्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विपुलकुमार मफतलाल जोगाणी हे हिरे व्यापारी असून ते खेतवाडी परिसरात राहतात. त्यांचा भारत डायमंड बोर्समध्ये हिरे विक्रीचा व्यवसाय आहे. चिराग आणि योगेश हे दोघेही बंधू असून त्यांचा हिरे खरेदी-विक्रीच्या दलालीचा व्यवसाय आहे. ते दोघेही विपुलकुमार यांच्या परिचित असून त्यांच्यात अनेकदा हिर्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.
फेब्रुवारी महिन्यांत या दोघांनी त्यांच्याकडून क्रेडिटवर सव्वाकोटीचे हिरे घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा हिरे परत आणून दिले नाही. सव्वाकोटीच्या हिर्यांचा अपहार करुन ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे विपुलकुमार जोगाणी यांनी दोन्ही आरोपी बंधूंविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तिघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.