व्हॅल्यूवेशलसाठी दिलेला 93 लाखाच्या सोन्याच्या बारचा अपहार
नोकरासह भावोजीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – व्हॅल्यूवेशनसाठी दिलेल्या सुमारे 93 लाखांच्या एक किलो सोन्याचे बार घेऊन नोकरासह त्याच्या भावोजीने पलायन केल्याची घटना धनजी स्ट्रिट परिसरात घडली. याप्रकरणी नोकरासह दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मोनू संक्ताप्रसाद तिवारी आणि विजय ऊर्फ राजा तिवारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही धनजी स्ट्रिट परिसरात राहतात. या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
जितेंद्र चुन्नीलाल जैन हे ज्वेलर्स व्यापारी असून परळ परिसरात राहतात. त्यांचा धनजी स्ट्रिट परिसरात जे साई नावाचे एक ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये मोनू हा काही वर्षांपासून कामाला असून जितेंद्र जैन यांचा अत्यंत विश्वासू नोकर म्हणून परिचित होता. सोमवारी 14 एप्रिलला त्यांनी मोनूला 93 लाख रुपयांचे एक किलो सोन्याचे बार टंच व व्हॅल्येवेशन करुन देण्यासाठी दिले होते. मात्र सोन्याचे बार घेऊन गेलेला मोनू पुन्हा शॉपमध्ये आला नाही. त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.
चौकशीनंतर मोनूने त्याच्या बहिणीचा पती विजय ऊर्फ राजासोबत संगनमत करुन जितेंद्र जैन यांनी दिलेल्या सोन्याचा बारचा अपहार करुन पलायन केल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून मोनू व त्याचे भावोजी विजय ऊर्फ राजाा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.