लग्नास नकार दिला म्हणून महिलेसह जावयावर चाकूने हल्ला
हल्ल्यात आरोपीही जखमी; तिन्ही जखमींवर उपचार सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – लग्नास नकार दिला म्हणून एका महिलेसह तिच्या जावयावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्लयात विजयलक्ष्मी सुरेश नायर, तिचा जावई निखील गागड आणि आरोपी विशाल तुकाराम भगत असे तिघेही जखमी झाले. या तिघांवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. विशालविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजता चेंबूर येथील वाशीनाका, एचपी कॉलनीजवळील शांती समृद्धी सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांंक डी/02/211 मध्ये 45 वर्षांची विजयलक्ष्मी सुरेश नायर ही महिला तिच्या कुटुंबियासोंबत राहते. तिला एक मुलगी असून विशालने तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तिने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने शुक्रवारी रात्री तीन वाजता तो त्यांच्या फ्लॅटच्या किचनच्या खिडकीतून घरात घुसला होता. यावेळी त्याने विजयलक्ष्मीसह तिचे दोन्ही मुली आणि जावई निखिल गागड याला तुम्हाला कोणालाही सोडत नाही. सर्वांचा आता गेमच करतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकूने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
या हल्ल्यात विजयलक्ष्मीच्या भुवई, ओठावर, पायाला आणि जावई निखील याच्या हाताला, बरगडी, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यात स्वत विशाल हा जखमी झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन स्थानिक लोकांना मदतीसाठी हाक मारली होती. त्यामुळे या रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. जखमी झालेल्या विजयलक्ष्मी, निखील आणि विशाल या तिघांनाही नंतर राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी विजयलक्ष्मी नायर हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर पोलिसांनी विशाल भगतविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
विशाल हा हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. तिथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. तपासात विशाल भगत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंग, अनैसगिंक लैगिंक अत्याचार, दुखापत करुन रॉबरीसह विनयभंग, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देणे अशा तीनहून गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून एक वर्षांचे लायक जामिनदारासह 25 हजाराचे बंधपत्र घेण्यात आले होते. मार्च 2025 रोजी त्याच्यावर तडीपारची कारवाईचा प्रस्ताव पोलीस उपायुक्ताकडे पाठविण्यात आला होता.