मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ मार्च २०२४
मुंबई, – बिग बॉस मालिकेत प्रवेश मिळवून देतो असे सांगून एका अभिनय क्षेत्राशी संबंधित ५० वर्षांच्या महिलेची अज्ञात व्यक्तीने फसवुणक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या व्यक्तीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
५० वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी येथे राहत असून ती अभिनय क्षेत्रात काम करते. १२ जानेवारीला तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये बिग बॉसमध्ये प्रवेश करण्यास मदत करणार असा एक मॅसेज प्राप्त झाला होता. या मॅसेजमध्ये दोन मोबाईल क्रमांक देण्यात आले होते. त्यामुळे तिने या मोबाईलवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने तिला बिग बॉसमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने तिच्याकडे तीस हजाराची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याचा युपीआय बारकोड स्कॅन करुन तीस हजार रुपये पाठवून दिले होते. त्यानंतर या व्यक्तीने विविध कारण सांगून तिला आणखीन पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून तसेच बिग बॉसमध्ये जाण्याची संधी असल्याने तिने त्याला पैसे ट्रान्स्फर केले होते. १२ जानेवारी ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत त्याला दोन लाख दहा हजार रुपये पाठविले होते.
मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे तिने त्याला दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने तिला पैसे परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून या टोळीने आतापर्यंत अनेकांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी वर्सोवा पोलिसांसह स्थानिक सायबर सेल पोलिसांकडून संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.