मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – अज्ञात मोबाईलवरुन मॅसेज पाठवून तो मॅसेज कंपनीच्या संचालकाचा असल्याचा भासवून अज्ञात सायबर ठगाने एका 61 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हॉटअपवर संचालकाचा बोगस प्रोफाईल लावून ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीसआले आहे.
संगीता राजपाल ही वयोवृद्ध महिला वांद्रे येथे राहत असून खार परिसरातील एका नामांकित कंपनीत अकाऊंट विभागात कामाला आहे. याच कंपनीत रुशेंद्र सिन्हा हे संचालक आहेत. कंपनीचे एका खाजगी बँकेत अकाऊंट असून सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी संगीता राजपाल यांच्याकडे आहे. 24 मार्चला तिला एका मोबाईलवरुन एक मॅसेज आला होता. त्यात रुशेंद्र सिन्हा यांच्या नावाचा उल्लेख होता. मोबाईल क्रमांक नवीन असल्याने तिने व्हॉटअपचा प्रोफाईल पाहिला. त्यात रुशेंद्र सिन्हा यांचा फोटो होता. त्याने तिला तुम्ही कार्यालयात आहात का अशी विचारणा केली. तिने होकार देताच या व्यक्तीने तिला एका बँक खात्याची डिटेल्स पाठविली. आपण एका महत्त्वाचा प्रोजेक्ट मिटींगमध्ये असून तातडीने संबंधित बँक खात्यात 50 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास तिला सांगण्यात आले होते.
हा मॅसेज संचालकाचा असल्याचे समजून तिने त्याने दिलेल्या बँक खात्यात तीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. काही वेळानंतर तिला पुन्हा दुसरा मॅसेज आला. त्यात त्याने तिला आणखीन वीस लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले. मात्र बँक खात्यात इतकी रक्कम नव्हती. त्यामुळे तिने संचालकाला फोन करुन याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी तिला तिच्या बँक खात्यातून ही रक्कम पाठविण्यास सांगितले. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने रुशेंद्र सिन्हा यांना कॉल केला होता. यावेळी तिने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून त्यांना धक्काच बसला होता. त्यांनी तिला कुठलाही मॅसेज केला नाही. तिला कुठल्याही बँक खात्याची डिटेल्स पाठवून तिला पैसे पाठविण्यास सांगितले नव्हते.
अशा प्रकारे तिच्या संचालकाच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने तिची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या मोबाईलची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यातील व्हॉटअपर रुशेंद्र सिन्हा यांचा फोटो असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्याची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.