मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – कौटुंबिक वादातून पत्नीने पतीवर तिघांच्या मदतीने प्राणघातक हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला. या हल्ल्यात दिलीप सुभाषचंद्र गुप्ता हा 34 वर्षांचा व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला असून जखमी झालेल्या दिलीपवर रोहिता या खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून दिलीपच्या पत्नीसह एका मारेकर्याला अटक केली आहे. विमल दिलीप गुप्ता आणि इम्रान नवशाद अमजद अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी पहाटे सव्वापाच वाजता दहिसर येथील मराठा कॉलनी, न्यू साई कलेक्शनसमोरील रस्त्यावर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याच परिसरातील सतेरी भुवन चाळीत दिलीप गुप्ता हा राहत असून त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. विमल ही त्याची पत्नी असून त्यांच्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. गुरुवारी सकाळी पाच वाजता दिलीप हा भाजी मार्केटमध्ये जात होता. मराठा कॉलनी, न्यू साई कलेक्शनसमोर येताच त्याला तीनजणांच्या एका टोळीने थांबवून बेदम मारहाण केली होती. लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला, पाठीला, हातापायाला गंभीर दुखापत झाली होती.
मारहाणीत तो बेशुद्ध झाला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. बेशुद्धावस्थेत दिलीपला तातडीने जवळच्या रोहिता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहे. हल्ल्यापूर्वी त्याच्या पत्नीने त्याला फोन करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर तिच्यासह इतर तिघांनी अचानक तिच्यावर हल्ला केला होता. त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस येताच विमलसह इतर तिघांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच विमलसह इम्रान या दोघांना पोलिसांनी अटक केली तर इतर दोन ते तीन हल्लेखोर पळून गेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.