हिर्यांसाठी घेतलेल्या दोन कोटीचा अपहारासह फसवणुक
हिरे व्यापारी बंधूंसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 एप्रिल 2025
मुंबई, – हिर्यांसाठी घेतलेल्या सुमारे दोन कोटीचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हिरे व्यापारी बंधूंसह तिघांविरुद्ध जुहू पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या तिघांचा शोध सुरु केला आहे. चिराग कोठारी, निमिश कोठारी आणि परवेज हुसैनभाई मंसुरी अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दर्शन सूर्यकांत शहा हे 48 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचा कापड तसेच डायमंड ट्रेडिंगच्या आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. सध्या ते अंधेरीतील जुहू क्रॉस लेन, कृष्णा अपार्टमेंटमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या वर्षी त्यांची त्यांच्या कॉमन मित्रामार्फत चिराग आणि निमिष कोठारी यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांची आरडीव्ही एक्सपोर्ट नावाची हिरेशी संबंधित कंपनी असल्याचे समजले होते. त्यांचाही हिरे आयात-निर्यातीचा व्यवसाय होता. याच दरम्यान त्यांच्या मित्राने त्यांना कोठारी बंधूंसोबत हिर्यांचा व्यवसाय सुरु करण्याचा सल्ला दिला होता. याच व्यवसायानिमित्त त्यांनी कोठार बंधूंची डायमंड मार्केट परिसरात भेट घेतली होती. त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान त्यांच्या हिर्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय झाला होता. ठरल्याप्रमाणे दर्शन शहा हे कोठारी यांच्या आरडीव्ही एक्सपोर्ट कंपनीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करत होते.
पेमेंट प्राप्त होताच त्यांच्याकडून त्यांना हिरे दिले जात होते. मार्च 2025 रोजी कोठारी बंधूंनी त्यांच्याकडे पाच कॅरेटचे साठ सॉलीटेअर हिर्यांसाठी दोन कोटीची मागणी केली होती. त्यांच्यावर विश्वास असल्याने त्यांनी त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात दोन कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. पेमेंट दिल्यानंतर चिरागने त्यांना 18 मार्च 2025 पर्यंत हिर्यांच्या डिलीव्हरीचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी हिर्यांची डिलीव्हरी केली नाही. कॉल केल्यानंतर चिराग आणि निमिश कोठारी त्यांचे कॉल घेत नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. हिर्यांसाठ दोन कोटी रुपये घेतल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. त्यांनी त्यांचे मोबाईल बंद ठेवले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी जुहू पोलिसांना घडलेा प्रकार सांगून कोठारी बंधूंसह परवेज मंसुरी या तिघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात दोन कोटीपैकी एक कोटीचे पेमेंट परवेज याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. कोठारी बंधूनंतर परवेज हादेखील पळून गेला होता. त्यानेच त्यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.