फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड तोतया आर्मी अधिकार्यांना अटक
फायर बिग्रेडच्या अधिकार्याला 2.35 गंडा घातल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – पनवेलच्या आबिवली परिसरातील फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक असल्याची बतावणी करुन बोरिवलीतील एका फायर बिग्रेड अधिकार्याला आर्मीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केल्याप्रकरणी दोन वॉण्टेड आर्मी अधिकार्याला बोरिवली पोलिसांनी अटक केली. दिनमोहम्मद जाकीर आणि आशिफअली ताहिर हुसैन अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने तक्रारदार अधिकार्याला 2 लाख 35 हजारांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
सुनिल नाना वाघ हे 40 वर्षांचे तक्रारदार बोरिवलीतील फायर बिग्रेड ऑफिसर क्वॉटर्समध्ये राहतात. बोरिवलीतील फायर फायटर विभागात केंद्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 2018 साली त्यांनी पनवेल अजिवली येथे एक फ्लॅट विकत घेतला होता. गेल्या वर्षी त्यांना नवीन फ्लॅट विकत घ्यायचा होता, त्यामुळे त्यांना पनवेलचा फ्लॅट विकायचा होता. त्यासाठी त्यांनी एका सोशल साईटवर फ्लॅट विक्रीची जाहिरात दिली होती. सप्टेंबर 2024 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी अशोककुमार बिष्णोई नावाच्या एका व्यक्तीने त्यांना कॉल करुन तो आर्मीमध्ये कामाला असल्याचे सांगितले. सध्या त्याची पोस्टिंग गुवाहटी येथे असून त्याने त्यांच्या पनवेलची त्यांची फ्लॅटची जाहिरात पाहिली आहे. त्यांच्या नातेवाईकांनी फ्लॅटची पाहणी केली असून त्यांना तो फ्लॅट आवडला आहे. त्यामुळे त्यांना फ्लॅट विकत घ्यायचा आहे असे सांगितले. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना आर्मी गणवेशातील त्याचे ओळखपत्र पाठविले होते.
ते ओळखपत्र पाहिल्यानंतर त्यांना तो खरोखरच आर्मी अधिकारी असल्याचे वाटले होते. यावेळी त्यांच्यात 27 लाखांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा पक्का झाला होता. यावेळी त्याने अडीच लाख रुपये टोकन म्हणून पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्याने हा संपूर्ण व्यवहार त्याचे सिनिअर आर्मी अधिकारी राजेंद्रसिंग शेखावत यांच्यासमक्ष होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर राजेंद्रसिंगने त्यांच्याशी फ्लॅटसंदर्भात सविस्तर चर्चा केली. सर्व व्यवहार आर्मीच्या बँक खात्यातून होणार असल्याने त्यांना आधी संबंधित खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात ऑनलाईन दोन लाख पत्तीस हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी दुसर्या दिवशी व्यवहार करु असे सांगून फोन बंद केला. दुसर्या दिवशी कॉल केल्यानंतर त्यांनी त्यांना पेमेंट अद्याप मिळाले नाही, त्यामुळे पुन्हा पेमेंट पाठविण्यास सांगितले. मात्र त्यांनी त्यांना पैसे पाठविण्यास नकार दिला. तसेच त्यांच्याकडे पाठविलेले पैसे पाठविण्याची विनती केली. मात्र त्यांनी त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठविले नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अशोककुमार बिष्णोई आणि राजेंद्रसिंग शेखावत नाव सांगणार्या तोतया आर्मी अधिकार्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित भामट्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दिनमोहम्मद आणि आशिफअली या दोन्ही तोतया आर्मी अधिकार्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.