मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
भिवंडी, – अनैतिक संबधासाठी जबदस्ती करुन मानसिक शोषण करणार्या फरहत इखलाक अहमद शेख या मित्राची त्याच्याच मित्राने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. हत्येचा कुठलाही पुरावा नसताना भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी तपास करुन पळून गेलेल्या आरोपी मित्राला उत्तरप्रदेशातून शिताफीने अटक केली. काजूकुमार रजेंदर राम असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला भिवंडीच्या भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत काजूकुमार हा पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारीवली गाव स्मशानभूमीजवळील पाचशे मीटर अंतरावरील खाडीजवळ फरहत शेख या व्यक्तीची अज्ञात व्यक्तीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून प्राप्त होताच भोईवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. फरहतला पोलिसांनी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्याच्या शरीरावर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांत भिवंडी गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. घटनास्थळाहून पोलिसांना कुठलेही पुरावे सापडले नव्हते.
तपासादरम्यान काजूकुमार या संशयिताचे नाव समोर आले होते. मात्र या हत्येनंतर तो पळून गेला होता. तो त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष माहीम हाती घेतल होती. ही शोधमोहीम सुरु असताना काजूकुमारला अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे, भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, राजेश गावडे, निलेश बोरसे, सुनिल साळुंखे, रंगनाथ पाटील, साबीर शेख, सचिन जाधव, सुदेश घाग, महिला पोलीस हवालदार माया डोंगरे, चालक पोलीस शिपाई रविंद्र साळुंखे यांनी शिताफीने ताब्यात घेतले.
चौकशीत काजूकुमार हा मूळचा उत्तरप्रदेशच्या जोनपूर, केराकत, हिरापुर मच्छहटीचा रहिवाशी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो त्याच्या वडिलांसोत कारीवली गावात राहत होता. तिथे तो लूम कामगार म्हणून कामाला होता. तो फरहतला ओळखत होता. कामानिमित्त ते दोघेही नेहमी भेटत होते. फरहत हा त्याच्यासोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यासाठी तो त्याला सतत शिवीगाळ करत होता. त्याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून काजूकुमारने फरहतची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली होती. या हत्येनंतर तो त्याच्या गावी पळून गेला होता. मात्र त्याला त्याच्या राहत्या घरातून या पथकाने शिताफीने अटक करुन हत्येचा गुन्ह्यांचा पर्दाफाश केला. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी भोईवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. गुन्ह्यांतील हत्यार लवकरच पोलिसांकडून जप्त केले जाणार आहे.