लॅपटॉप अपहारप्रकरणी वॉण्टेड कंपनीच्या मालकाला अटक
अनेक कंपन्यांकडून लॅपटॉप घेऊन मार्केटमध्ये विक्री केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – डिलीव्हरी केलेल्या लॅपटॉपच्या पैशांचा अपहार करुन पळून गेलेल्या एका खाजगी कंपनीच्या वॉण्टेड मालकाला एक वर्षांनी मालाड पोलिसांनी अटक केली. आशिष राधेश्याम चिंचानी असे या आरोपी मालकाचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत कंपनीचा दुसरा मालक राहुल पौद्दार आणि पर्चेस मॅनेजर नितीन थळे हे दोघेही सहआरोपी आहेत. या टोळीने मुंबईसह इतर शहरातील व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप घेऊन त्याची काळ्या बाजारात विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे बोलले जाते.
अजय जगन्नाथ वानखेडे हे ठाण्यातील रहिवाशी असून त्यांचा संगणक व लॅपटॉप विक्रीचा संपूर्ण महाराष्ट्रात व्यवसाय आहे. त्यांची ठाण्याला एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे सर्व व्यवहार ते स्वत पाहतात. गेल्या वर्षी मार्च महिन्यांत त्यांना नितीन थळे नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो गल्ब टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. त्याने त्यांच्याकडे त्याच्या कंपनीसाठी काही लॅपटॉपची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी नितीनच्या मालाड येथील कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी तिथे नितीन स्वत उपस्थित होता. त्याने कंपनीचा मालक राहुल पौद्दार आणि आशिष चिंचानी असल्याचे सांगून त्यांना भविष्यात त्याच्या कंपनीकडून चांगला बिझनेस मिळेल असे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.
नितिनकडून पर्चेस ऑर्डरसह सव्वासहा लाखांचे पार्ट पेमेंट प्राप्त होताच त्यांनी त्याच्या मालाड येथील कार्यालयात लॅपटॉपची डिलीव्हरी केली होती. डिलीव्हरीनंतर त्यांचे उर्वरित रक्कमही त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यामुळे अजय वानखेडे यांना नितीनवर विश्वास बसला होता. मे महिन्यांत त्याने त्यांच्याकडे आणखीन 37 लॅपटॉपची मागणी करुन त्यांना पावणेपाच लाखाचे पेमेंट केले होते. यावेळी त्याने उर्वरित पेमेंटचे दोन धनादेश दिले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यामुळे त्यांनी नितीनसह कंपनीचे मालक आशिष आणि राहुल यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. दिलेल्या मुदतीत त्यांचे सात लाख नऊ हजार रुपयांचे पेमेंट केले नव्हते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन थळे, राहुल पौद्दार आणि आशिष चिंचानी यांच्याविरुद्ध अपहारसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच गुन्ह्यांत आशिष हा गेल्या एक वर्षांपासून फरार होता. तीन दिवसांपूर्वी वॉण्टेड असलेल्या आशिषला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्राथमिक तपासात या तिघांनी अजय वानखेडे यांच्या कंपनीसह पंकज संचेती यांच्या कॉम्प्रींट टेक सोल्यूशन, वाघमारे यांच्या चामुंडाई आयटी अॅण्ड पॉवर सोल्युशन, प्रमोद यांच्या अॅरो इन्फोटेक, अमीत यांच्या जिशान इन्फोसिस्टीम व इतर कंपनीचा विश्वास संपादन करुन, पार्ट पेमेंट करुन त्यांच्याकडे लाखो रुपयांचे लॅपटॉप घेतले होते, मात्र उर्वरित पैशांचा अपहार करुन संबंधित कंपनीच्या मालकांची फसवणुक केली होती. या लॅपटॉपची त्यांनी मार्केटमध्ये विक्री करुन या पैशांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.